जीडीसीसी बँकेच्या केशोरी शाखेत कर्मचाऱ्यांचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:30 AM2021-05-18T04:30:20+5:302021-05-18T04:30:20+5:30
केशोरी : येथील जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेत गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पदामुळे दोन कार्यरत कर्मचारी रोखपाल आणि ...
केशोरी : येथील जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेत गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पदामुळे दोन कार्यरत कर्मचारी रोखपाल आणि प्रभारी व्यवस्थापक रात्री उशिरापर्यंत बँकेच कामकाज करण्याची वेळ आली आहे. दोन कर्मचाऱ्यांना सर्व कामे करावी लागत असल्याने ग्राहकांनासुद्धा त्याचा फटका बसत आहे.
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी येथील जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा एकमेव असून या परिसरातील शेतकरी, शेतमजूर, कर्मचारी यांची बँक खाती मोठ्या प्रमाणात आहेत. राजोली भरनोली पासून शेतकरी खातेधारक आहेत. सुरुवातीला या बँकेत व्यवहार कमी असताना १ व्यवस्थापक, १ रोखपाल,१ बँक निरीक्षक, २ लिपिकवर्गीय कर्मचारी आणि २ सेवकसह असे एकूण सात कर्मचारी कार्यरत होते. सध्या ही बँक शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची बँक असल्याने बँकेचे व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. मात्र, बँकेतील कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाली. फक्त दोनच कर्मचारी या बँकेचे कामकाज सांभाळत असल्यामुळे त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या परिसरातील सर्वच अनुदानित शाळांमधील कर्मचाऱ्यांचे वेतन या बँकेमार्फत केली जात असून कामाच्या तुलनेत बँकेतील मनुष्यबळ कमी पडत असल्यामुळे रोजंदारीवर असलेल्या सेवकांना कामे सांगण्याची वेळ येत आहे. नित्यनिधी एजंट देखील बँकेतील कामे करताना दिसून येतात. कार्यरत दोन कर्मचाऱ्यांवर कामाचा अधिक ताण वाढल्याने बँकेचे दैनंदिन व्यवहार प्रभाावित होवू लागली आहेत. विनाकारण शेतकऱ्यांना लहान-लहान कामांसाठी दिवसभर बँकेत ताटकळत उभे राहण्याची वेळ आली आहे. मध्यवर्ती बँकेच्या जिल्हा प्रशासनाने या प्रकरणी त्वरित दखल घेऊन केशोरी बँक शाखेत रिक्त असलेली पदे भरण्याची मागणी खातेधारकांनी केली आहे.