जिल्हा परिषदेच्या शाळांवर शिक्षकांची कमतरता

By admin | Published: September 11, 2014 11:37 PM2014-09-11T23:37:24+5:302014-09-11T23:37:24+5:30

शैक्षणिक सत्र सुरू होऊन तीन महिने लोटूनही जिल्हा परिषद शाळांवरील विद्यार्थ्याना शिक्षक मिळत नसल्याने विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहात आहेत. अनेक ठिकाणी शिक्षकांच्या मागणीला घेऊन

Lack of teachers on Zilla Parishad schools | जिल्हा परिषदेच्या शाळांवर शिक्षकांची कमतरता

जिल्हा परिषदेच्या शाळांवर शिक्षकांची कमतरता

Next

आमगाव : शैक्षणिक सत्र सुरू होऊन तीन महिने लोटूनही जिल्हा परिषद शाळांवरील विद्यार्थ्याना शिक्षक मिळत नसल्याने विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहात आहेत. अनेक ठिकाणी शिक्षकांच्या मागणीला घेऊन विद्यार्थी-पालकांचे आंदोलन होत असताना अजूनही शिक्षकांची मागणी पूर्ण झालेली नाही. यासाठी जिल्हा परिषदेचे अधिकारी व पदाधिकारी यांच्यातील समन्वयाचा अभाव हे कारण सांगितले जात आहे.
जिल्हा परिषद शाळांतील सर्वागिण विकासाचा पाया रुजविण्याचे ध्येय शासनाने ठेवून अनेक योजना कार्यान्वित केल्या. विद्यार्थ्यांचा प्राथमिक विकास घडवावा या हेतुने निधीची कमतरता येत नाही. परंतु या योजनांना कार्यालयीन अधिकारी-पदाधिकारी यांच्या अकार्यक्षमतेमुळे अनेक समस्या जिल्हा परिषद वर्तुळात निर्माण झाल्या आहेत.
जिल्हा परिषद शाळांमधून सर्वसामान्य नागरिकांच्या मुलांना हक्काचे शिक्षण देणारे गुरूकूल गावपातळीवर उपलब्ध आहे. शाळामध्ये शासन निधीअंतर्गत विद्यार्थ्यांना विविध सुविधा पुरविण्यात येत आहे. अनेक प्राथमिक शाळांना वरिष्ठ विद्यालयाची परवानगी देण्यात आली आहे. १ ते ४ पर्यंतच्या शाळांमध्ये वर्ग ५ ची तुकडी मान्य करण्यात आली आहे. अनेक शाळांमध्ये वाढीव तुकडी मंजुर करण्यात आली. यावर्षी शाळा २६ जूनला प्रारंभ करण्यात आल्या. विद्यार्थी पालकांनी शाळेतील वाढीव तुकडीत विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित केले, परंतु शाळा उघडून तीन महिने लोटूनही या विद्यार्थ्यांना पात्र शिक्षक मिळालेच नाही. शाळेतील अभ्यासक्रम शिक्षक मिळेपर्यंत सहायक शिक्षकांच्या खांद्यावर देण्यात आला. परंतु अनेक विषयांचा अभ्यास संबंधित विषयातील शिक्षकांअभावी मागे पडला आहे.
आमगाव तालुक्यात जिल्हा परिषदेअंतर्गत माध्यमिक शाळा दोन, उच्च माध्यमिक ३६ व प्राथमिक शाळा ७८ एकूण ११६ विद्यालय कार्यरत आहेत. यावर्षी आरटीईअंतर्गत शिक्षकांच्या पटनिहाय संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाचे गोडवे सावकाशपणे आत्मसात करता आले असते. परंतु या विद्यालयांमध्ये शिक्षकांच्या कमतरतेमुळे शिक्षणाचे ध्येय गाठणे कठीण झाले आहे. अनेक शाळांमध्ये वर्ग ५ ची तुकडी मान्य करण्यात आली आहे. इतर शाळांना वाढीव तुकडी मंजूर करण्यात आली, परंतु वाढीव तुकडी मंजुर करण्याचे नियोजन हाती घेऊन सुध्दा त्या शाळांवर शिक्षकांची पूर्तता करताना जिल्हा परिषद प्रशासन मागे पडले आहे. त्यामुळे अर्धे सत्र संपत असून या शाळांमधील विद्यार्थ्यांची पाटी कोरीच दिसत आहे.
तालुक्यात उच्चश्रेणी मुख्याध्यापकांची १० पदे रिक्त आहेत. आंतरजिल्हा बदलीने सहा शिक्षक गेल्याने सहाय्यक शिक्षकांची पदे रिक्त झाली. यात वाढीव उच्च माध्यमिक व माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थी पटसंख्येप्रमाणे पदविधर व इतर शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित होत आहेत. शाळेत परिपूर्ण शिक्षण मिळत नसल्याने पालक चिंतीत झाले आहेत. शाळा पातळीवर शाळा समितीच्या माध्यमाने पालकांनी शिक्षकांच्या मागणीला घेऊन आंदोलने केली आहे. परंतु या मागणीला पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन हतबल ठरत आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Lack of teachers on Zilla Parishad schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.