लखपतीला चोरीच्या प्रकरणात दोन वर्षाचा कारावास, मुख्य न्यायदंडाधिकारी यांचा निकाल
By नरेश रहिले | Published: April 30, 2023 08:30 PM2023-04-30T20:30:01+5:302023-04-30T20:30:08+5:30
लखपतीवर २२ गुन्हे दाखल
गोंदिया: शहरात चोरी करणाऱ्या आरोपीला मुख्य न्यायदंडाधिकारी अभिजीत कुलकणी यांनी दोन वर्षाचा सश्रम कारावास व १ हजार रूपये दंड ठोठावला. ही सुनावणी २९ एप्रिल रोजी करण्यात आली आहे.
२२ सप्टेंबर २०२२ रोजी गोंदियाच्या दुर्गाचौक जगदंबा धामच्या जवळ राहणारे दिनेशकुमार रामप्रसाद अग्रवाल (५५) यांच्या घरासमोर हॅंडल लॉक करून ठेवलेली मोटार सायकल एम.एच.३५ आर ३५७३ ही या आरोपीने पळविली होती. ती मोटारसायकल ४० हजार रूपये किंमतीची होती. या प्रकरणात आरोपी लखपती उर्फ लक्ष्या बस्ताराम फेंडर (२७) रा. आमाटोला पिंजारी वाॅर्ड क्रमांक १३ वाराशिवणी, जि. बालाघाट (मध्यप्रदेश) याला अटक करण्यात आली.
गोंदिया शहर पोलिसात कलम ३७९ अंतर्गत अटक करण्यासाठी न्यायालयाच्या आदेशाने प्रोडक्सन वारंटवर आरोपीला मध्यवर्ती कारागृह नागपूर येथून अटक केली होती. खटल्याच्या सुनावणीत आरोपी लखपती उर्फ लक्या बस्ताराम फेंडर (२७) रा. आमाटोला, पिंजारी वाॅर्ड क्रमांक १३ वाराशिवणी, जि. बालाघाट (मध्यप्रदेश) याच्या विरूद्ध साक्षपुराव्यावरून २९ एप्रिल २०२३ रोजी त्याला २ वर्ष सश्रम कारावास व १ हजार रूपये द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली.
तपास महिला पोलीस हवालदार रिना चौव्हाण यांनी केला होता. खटल्याचे युक्तीवाद सहायक सरकारी अभियोक्ता सुरेश रामटेके यांनी केला.न्यायालयीन कामकाज पोलीस हवालदार ओमराज जामकाटे, पोलीस शिपाई किरसान यांनी केले. उत्कृष्ट तपासाबाबत पोलीस अधिक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधिक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल ताजणे, गोंदिया शहरचे ठाणेदार चंद्रकांत सुर्यवंशी यांनी कौतुक केले.
लखपतीवर २२ गुन्हे दाखल
शिक्षा झालेला आरोपी लखपती उर्फ लक्ष्या बस्ताराम फेंडर (२७) रा. आमाटोला पिंजारी वाॅर्ड क्रमांक १३ वाराशिवणी, जि. बालाघाट (मध्यप्रदेश) याच्याविरुद्ध गोंदिया शहर पोलीस ठाण्यात ४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नागपुर शहरात १४ गुन्हे, भंडारा जिल्ह्यात १ गुन्हा तसेच बालाघाट येथे ३ गुन्हे दाखल आहेत. दोन राज्यात २२ गुन्हे दाखल असलेला हा आरोपी आहे.