लालपरीला छत्तीसगडमध्ये परवानगी, मात्र मध्यप्रदेशात प्रवेश नाहीच ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:19 AM2021-07-09T04:19:25+5:302021-07-09T04:19:25+5:30
गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यातील एसटीला परराज्यांत प्रवेश बंदी करण्यात आली होती. शिवाय कोरोनाच्या धास्तीमुळे नागरिकांनी प्रवास टाळल्याने ...
गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यातील एसटीला परराज्यांत प्रवेश बंदी करण्यात आली होती. शिवाय कोरोनाच्या धास्तीमुळे नागरिकांनी प्रवास टाळल्याने राज्य रस्ते परिवहन महामंडळ संकटात आले होते. आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून जनजीवन हळूवार पूर्वपदावर येत असल्यामुळे एसटीलाही परवानगी देण्यात आली आहे. मात्र आजही नागरिक प्रवासाला घाबरत असल्याने जेमतेम गाड्यांचा डिझेल खर्च निघत आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील गोंदिया आगारातील गाड्या लगतच्या छत्तीसगड व मध्यप्रदेश दोन्ही राज्यांत जातात. तर तिरोडा आगारातील गाड्या मध्यप्रदेशात जातात. असे असतानाही छत्तीसगड राज्यात लालपरीला प्रवेशास परवानगी मिळाली आहे. मात्र मध्यप्रदेश राज्याने आणखी १७ तारखेपर्यंत लालपरीला प्रवेश स्थगिती दिली असल्याची माहिती आहे. यामुळे गोंदिया आगारातील गाड्या छत्तीसगड राज्यात जात असून लालपरीला मध्यप्रदेशात मात्र प्रवेशबंदी असल्याने सीमेवरूनच गाड्यांना परत यावे लागत आहे.
------------------------
- जिल्ह्यातील एकूण आगार - २
एकूण बसेस -१२१
सध्या सुरू असलेल्या बसेस -९९
रोज एकूण फेऱ्या - २३१
दुसऱ्या राज्यात जाणाऱ्या बसेस - १०
----------------------------------------
सध्या तरी जेमतेम कारभार
जिल्ह्यातील गोंदिया आगारातील १ फेरी छत्तीसगड राज्यातील डोंगरगडपर्यंत तर ५ फेऱ्या मध्यप्रदेश राज्यात जात होत्या. तसेच तिरोडा तालुक्यातील ४ फेऱ्या मध्यप्रदेश राज्यात जात होत्या मात्र कोरोनाची दुसरी लाट बघताच मध्यप्रदेश शासनाने महाराष्ट्रातील बसेसला प्रवेशबंदी केली ती आतापर्यंत कायम आहे. यामुळे आगारांना तेवढा तोटा सहन करावा लागत आहे. शिवाय आजही नागरिकांच्या मनातील भीती कायम असल्याने नागरिक एकतर प्रवास टाळत आहे. शिवाय खाजगी वाहनानेच प्रवास करीत असल्याचे दिसत आहे. परिणामी आजही एसटीचा कारभार जेमतेम डिझेल काढण्या पुरताच सुरू आहे.
------------------------------
डोंगरगडसाठी एकच बस
कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याने काही राज्यांनी आता प्रवासाला परवानगी दिली असून त्यात छत्तीसगड राज्यानेही परवानगी दिली आहे. यामुळे आता गोंदिया आगारातील एक फेरी डोंगरगडला जात आहे. मात्र डोंगरगड हे रेल्वेमार्गावर असल्याने एसटी प्रवास करणाऱ्यांची संख्या जेमतेमच आहे. तर मध्यप्रदेश शासनाने परवानगी न दिल्याने बालाघाट व लांजीला जाणाऱ्या फेऱ्या बंद आहेत. यामुळे प्रवाशांना अन्य वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.
---------------------------
ग्रामीण भागातील काही फेऱ्या बंदच
कोरोनाची दुसरी लाट ओसरली असून आता जिल्ह्यात नाममात्र रूग्ण निघत आहेत. एकंदर जिल्ह्यातील स्थिती नियंत्रणात आली आहे. मात्र दुसऱ्या लाटेने केलेला कहर बघता लोकांमध्ये आजही दहशत आहे. त्यात बसने प्रवास केल्यास गर्दीतून लागण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने नागरिकानी प्रवास टाळला आहे. शिवाय अत्यंत गरज असल्याने आपल्या वाहनानेच प्रवास करीत आहेत. यामुळेच ग्रामीण भागातील अंतर्गत गावांतून नागरिक आजही बाहेर पडत नसल्याने तेथे जाणाऱ्या फेऱ्या आजही बंदच आहेत.
----------------------
नागपूर मार्गावरच असते गर्दी
गोंदिया व तिरोडा आगारांसाठी नागपूर मार्ग हाच एकमेव मार्ग कमाई करून देणार मार्ग आहे. कारण, जिल्ह्यातील कित्येक नागरिक, कर्मचारी व विद्यार्थ्यांना शिक्षण, शासकीय कामे, उपचार, खरेदी व व्यक्तीगत कामानिमित्त नागपूर येथे ये-जा करावी लागते. शिवाय मधात भंडारा येत असून आजही कित्येक कार्यालयांचा कारभार भंडारा येथूनच सुरू आहे. यामुळे येथील नागरिक व कर्मचाऱ्यांना भंडारा येथे जावे लागते. म्हणूनच या मार्गावर बाराही महिने वर्दळ असते व या मार्गावरील फेऱ्यांना प्रवासी प्रतिसाद आहे.
-----------------------------