लालपरीचे.. दर भारी... वऱ्हाडींची ट्रॅव्हल्सवारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2022 05:00 AM2022-05-18T05:00:00+5:302022-05-18T05:00:06+5:30

अर्धा लग्नसराईचा हंगाम हा एसटीच्या हातून सुटला. आता संप मिटल्यावर लालपरी रस्त्यावर सुसाट धावताना दिसत आहे; परंतु नैमित्तिक कारणांसाठी म्हणजेच विवाह सोहळा, मुलांची सहल नेण्यासाठीदेखील आधी प्राधान्य हे एसटी बसलाच मिळत होते. आज डिझेलचे दर शंभरी पार गेले आहेत. त्यामुळे एसटीनेही आपला किलोमीटर प्रवासाचा दर हा थेट ५५ रुपये प्रतिकिलोमीटर केला, तर दुसरीकडे शिवशाहीचा दर हे ७२ रुपये अधिक जीएसटी, असा निश्चित केला आहे.

Lalpari's .. rates are heavy ... bridal travels! | लालपरीचे.. दर भारी... वऱ्हाडींची ट्रॅव्हल्सवारी!

लालपरीचे.. दर भारी... वऱ्हाडींची ट्रॅव्हल्सवारी!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया :  राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस ही जनसामान्यांची प्रवासवाहिनी आहे. त्यात लग्नसराई म्हटली की, वऱ्हाडी मंडळींना विवाहस्थळी नेण्यासाठी एसटीचाच उपयोग होत होता; परंतु एसटीचे दर हे खासगी ट्रॅव्हल्सच्या तुलनेने अधिक असून, त्यात ‘एसी’ अर्थात वातानुकूलिताची व्यवस्था नसल्याने एसटीऐवजी अनेक जण हे खासगी ट्रॅव्हल्सलाच पसंती देत असल्याचे दिसून येत आहे.
 आधीच एसटीचा पाय खोलात असताना मध्यंतरी ६ महिने कर्मचाऱ्यांनी संपूर्ण राज्यभर संप पुकारला होता. त्यामुळेही अर्धा लग्नसराईचा हंगाम हा एसटीच्या हातून सुटला. आता संप मिटल्यावर लालपरी रस्त्यावर सुसाट धावताना दिसत आहे; परंतु नैमित्तिक कारणांसाठी म्हणजेच विवाह सोहळा, मुलांची सहल नेण्यासाठीदेखील आधी प्राधान्य हे एसटी बसलाच मिळत होते. आज डिझेलचे दर शंभरी पार गेले आहेत. त्यामुळे एसटीनेही आपला किलोमीटर प्रवासाचा दर हा थेट ५५ रुपये प्रतिकिलोमीटर केला, तर दुसरीकडे शिवशाहीचा दर हे ७२ रुपये अधिक जीएसटी, असा निश्चित केला आहे. या सर्व दरवाढीमुळे एसटीला पूर्वी हमखास मिळणारे उत्पन्न आता झपाट्याने घटले आहे. नैमित्तिक कारणांसाठी आता एसटी परवडत नसल्याचे दिसते. 

 आता निवडणुकाच तारतील 

- एसटी महामंडळाचे नैमित्तिक उत्पन्न झपाट्याने कमी झाले आहे. तरीही निवडणुकांत एसटीचीच गरज असल्याने एसटी महामंडळाला आता निवडणुकांचा आधार दिसून येतो. 
- सुरक्षित ईव्हीएम मतदान केंद्र, तसेच मतदान झाल्यावर हेच ईव्हीएम मशीन पुन्हा मतमोजणी ज्याठिकाणी आहे, त्या ठिकाणी पोहोचविण्यासाठी अद्याप तरी एसटीचाच उपयोग केला जातो. शिवाय, आता येत्या दिवाळीतही एसटीला उत्पन्नाची संधी आहे. 

वाढते तापमान एसटीची डोकेदुखी 
- मार्च महिन्यापासूनच पारा ४० अंशावर गेला आहे. त्यात आता मे महिन्यात पारा ४४ अंशावर गेला असून, उकाडा असह्य होत आहे. अशात खासगी ट्रॅव्हल्स कमी भाड्यात व एसीयुक्त मिळत असल्याने अनेक जण वरातीसाठी आता ट्रॅव्हल्सलाच पसंती देताना दिसतात. परिणामी, लग्नाच्या वरातीतून लालपरी बाद झाल्याचे दिसते. 

 असे आकारले जातात दर 

- महामंडळाकडून लालपरीसाठी आता ५५ रुपये प्रतिकिलोमीटरनुसार दर आकारला जात असून, त्यात २०० किलोमीटरपर्यंत दर घेतला जातो. २०० किलोमीटरपेक्षा जास्त गाडी चालल्यास ५५ प्रतिकिलोमीटर गुणिला जेवढे किलोमीटर गाडी चालली तेवढा दर त्यात १८ टक्के जीएसटी व ५० रुपये अपघात निधी जोडला जातो. 
- शिवशाहीसाठी ७२ रुपये प्रतिकिलोमीटर दर आकारला जात असून, त्यात ३०० किलोमीटरपर्यंत दर घेतला जातो. त्यावर गेल्यास सारखेच गणित असून, येथे ५ टक्के जीएसटी व ५० रुपये अपघात निधी घेतला जातो.

 

Web Title: Lalpari's .. rates are heavy ... bridal travels!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.