जमीन खरेदीदारालाच गोवले

By admin | Published: April 11, 2015 01:51 AM2015-04-11T01:51:08+5:302015-04-11T01:51:08+5:30

तालुक्याच्या किडंगीपार येथील बोगस रजिस्ट्री प्रकरणात पोलिसांनी जमीन खरेदीदारालाच आरोपी बनविले आहे.

The land buyers got the land | जमीन खरेदीदारालाच गोवले

जमीन खरेदीदारालाच गोवले

Next

बोगस रजिस्ट्री प्रकरण : पोलिसांचा अजब कारभार
आमगाव :
तालुक्याच्या किडंगीपार येथील बोगस रजिस्ट्री प्रकरणात पोलिसांनी जमीन खरेदीदारालाच आरोपी बनविले आहे. बोगस सातबारा बनविणारा दुसराच, मात्र खरेदीदाराला पोलिसांनी आरोपी बनविल्यामुळे पोलीस कारवाईबाबत नागरिक संशय व्यक्त करीत आहेत.
आमगावच्या किडंगीपार येथील गट क्र.४७ आराजी २.७३ हेक्टर आर भूमीधारकापैकी .२० हेक्टर आर जमीन डॉ. शशांक डोये यांनी १५ मार्च २०११ ला नागपूच्या वर्धमान नगर येथील सहेसराम मारोती कोरोटे यांच्याकडून २३ मार्च २०११ रोजी खरेदी केली. त्यासाठी २५ लाख रूपये प्रतिएकरप्रमाणे सौदा केला. त्यातील १२ लाख ५० हजार रूपये डॉ.शशांक डोये यांनी सहेसराम कोरोटे यांना दिले. या जमिनीची रजिस्ट्री करण्यासाठी त्यांना म्हटल्यावर त्यांनी रजिस्ट्री करून दिली नाही. कोरोटे यांनी त्या गट क्रमांकातील काही जमीन अनिलकुमार दसाराम बिसेन व फिर्यादी सिंघानिया यांना विकली. डॉ.डोये यांनी खरेदी केलेल्या जमिनीची रजिस्ट्री अनिल बिसेन हे करून देतील असे सांगण्यात आले. डॉ.डोये यांचा मागील १० वर्षापासून २० आर जमिनीवर कब्जा आहे. त्यांना अनिल बिसेन यांनी रजिस्ट्री करून दिली. फेरफार करण्यासाठी डोये हे बिसेन यांना म्हणत असताना त्यांच्याकडे बिसेन दुर्लक्ष करीत होते. वारंवार म्हटल्यावर बिसेन यांनी न्यायालयात रजिस्ट्री रद्द करण्यासाठी अर्ज लावून खोटा सातबारा जोडल्याचे सांगितले.
या प्रकरणात डॉ.डोये हे जमीन खरेदी करणारे आहेत. त्यांनी काहीही बोगस कागदपत्र तयार केले नसताना त्यांना आरोपी बनविण्यात आले. बिसेन याने किडंगीपार येथील जमिनीचे अकृषक आदेश मिळवून सीटी सर्विस आॅफीस गोंदिया यांच्या मंजुरीचे प्लॅनिंग करून त्या भूखंडात ४९ प्लॉट तयार केले. त्यांनी काही प्लॉट विक्री केले तर काही वाटणी करून आपल्या नावावर केले. त्यांच्याकडे आता सात प्लाट शिल्लक आहेत. सिंघानिया यांच्या नावाची खोटी स्वाक्षरी करून प्लॉट व सरकारी जागेचा सात-बारा काढून अनिल बिसेन यांनी ती जागा स्वत:ची असल्याचे दाखविले. बिसेन यांनी केलेल्या कृत्याची शिक्षा डॉ.शशांक डोये यांना का? पोलिसात केलेल्या तक्रारीत त्यांच्या नावाचा समावेश नसताना पोलिसांनी आरोपी कसे काय बनविले? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या प्रकरणात आमगाव पोलिसांनी भादंविच्या ४१९, ४२०, ४६५, ४६६, ४६७, ४६८, ४७१, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.


तलाठी महिलेला अटक
या प्रकरणात आमगाव पोलिसात रिसामा येथील तलाठी स्मीता बोबडे यांना गुरूवारी अटक केली आहे. अनिल बिसेन यांनी रजिस्ट्री करण्यासाठी वापरलेला सातबारा बोगस असल्याने तो सातबारा तलाठ्याने दिला की बिसेनने स्वत: तयार केला, हे बिसेन यांच्या बयानावरून कळेल. परंतु पोलिसांनी या प्रकरणात बोबडे यांना अटक केली आहे.
ठाण्यात १० तास बसूनही फरार कसा?
बोगस रजिस्ट्री प्रकरणाची तक्रार सिंघानिया यांनी तीन महिन्यांपूर्वीे आमगाव पोलिसांकडे केली होती. या प्रकरणात मंगळवारी आमगाव पोलिसांनी अनिल बिसेन व डॉ.शशांक डोये यांना पोलीस ठाण्यात बोलविले. त्यावेळी अनिल बिसेन याला अटक करण्यात आली. मंगळवारी १० तास डॉ.डोये आमगावच्या पोलीस ठाण्यात बसले होते. त्यानंतर त्यांना घरी जायला सांगितले. परंतु अचानक त्यांचे नाव एफआयआरमध्ये कसे टाकण्यात आले, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
हस्तलेखन एक्सपर्टचा आधार घेणार?
रजिस्ट्री करण्यासाठी तयार करण्यात आलेला बोगस सातबारा कुणी तयार केला याची माहिती जाणून घेण्यासाठी आमगाव पोलिसांना हस्तलेखन एक्सपर्टचा आधार घ्यावा लागेल. तलाठी व आरोपी यांच्या स्वाक्षऱ्या घेऊन त्या बोगस सातबाऱ्यावर असलेले लिखान व स्वाक्षऱ्या कुणाच्या आहेत याची माहिती मिळवावी लागणार आहे. त्यानंतर या प्रकरणात बोगस रजिस्ट्रीसाठी तयार केलेला सातबारा कुणी तयार केला याची माहिती पुढे येऊ शकते.

Web Title: The land buyers got the land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.