लस कोरोना योध्दयांना दिलासा जिल्हावासीयांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:25 AM2021-01-17T04:25:45+5:302021-01-17T04:25:45+5:30
गोंदिया : कोरोनाची लस आज येणार उद्या येणार.. येणार अशी चर्चा मागील दोन तीन महिन्यापासून सुरु होती. त्यानंतर भारतात ...
गोंदिया : कोरोनाची लस आज येणार उद्या येणार.. येणार अशी चर्चा मागील दोन तीन महिन्यापासून सुरु होती. त्यानंतर भारतात निर्मित दोन लसींना मान्यता मिळाल्यानंतर १६ जानेवारीपासून प्रत्यक्षात फ्रंट लाईन कोरोना योध्दयांना लसीकरणाने मोहिमेचा शुभारंभ झाला आणि संपूर्ण जिल्हावासीयांना दिलासा मिळाल्याने सर्वांच्या चेहऱ्यांवर समाधानाचे भाव होते.
गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना लसीकरण मोहिमेच्या शुभारंभासाठी जोरदार तयारी करण्यात आली होती. आकर्षक मंडप आणि लसीकरण केंद्राची सुध्दा सजावट करण्यात आली होती. त्यामुळे शुक्रवारी लसीकरणाच्या महोत्सवाला सुरुवात झाली. जिल्ह्यात सर्वात प्रथम वरिष्ठ शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र जैन यांना लस टोचून या ऐतिहासिक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रामुख्याने आ. विनोद अग्रवाल, नगराध्यक्ष अशोक इंगळे, आरोग्य उपसंचालक तथा निरीक्षक रवींद्र धकाते, अधिष्ठाता डॉ.नरेश तिरपुडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरीश मोहबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.सुवर्णा हुबेकर, प्राचार्य डॉ. अंजन नायडू, नगरसेविका भावना कदम, सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर, दिव्या भगत उपस्थित होत्या. मेडिकलच्या लसीकरण केंद्रावर जिल्हास्तरीय लसीकरणाचा शुभारंभ झाला. डॉ.राजेंद्र जैन यांना कोविशिल्डची पहिली लस देण्यात आली. त्याचप्रमाणे तिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात डॉ.हिम्मत मेश्राम आणि देवरी ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांना लसीकरण करुन या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर या तिन्ही केंद्रावर पहिल्याच दिवशी प्रत्येकी १०० आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. लस दिल्यानंतर कुठलीही समस्या अथवा त्रास जाणविल्याच्या तक्रारी आल्या नाही. लसीकरण सुरळीतपणे पार पडले.
.....
आठवड्यातून तीन दिवस लसीकरण
कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात फ्रंट लाईना कोरोना योध्दयांना लसीकरण केले जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातील ८४२८ डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्याची कोविन ॲपवर नोंदणी झाली आहे. आज पहिल्या दिवशी ३०० जणांना लसीकरण करण्यात आले. यानंतर मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या तीन दिवशी कोरोना लसीकरण केले जाणार आहे. यासाठी १० हजार २६० लस जिल्ह्याला प्राप्त झाल्या आहेत.
.....
लसीकरणाची उत्सुकता
पहिल्या टप्प्यात शुक्रवारी आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आले. या लसीकरणाला घेऊन लस घेण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये उत्सुकत दिसून आली. लसीचा बहुमान सर्वात प्रथम आरोग्य कर्मचाऱ्यांना दिल्याने त्यांनी आभार मानले.
......
लसीकरणानंतर उपाययोजनांकडे नको दुर्लक्ष
कोरोना लसीकरण झाल्यानंतर कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे दुर्लक्ष करू नका, मास्क, सॅनिटायझर, फिजिकल डिस्टसिंग आणि इतर गोष्टींचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना आरोग्य विभागाने केल्या आहे.
....
मोबाईलवर येणार संदेश
कोविन ॲपवर नोंदणी झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणा संदर्भातील संदेश त्यांनी नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर पाठविला जाणार आहे. यानंतर त्यांना त्या दिवशी केंद्रावर लसीकरणासाठी जावे लागणार आहे.
...
कोट : कोविडची लस घेताना मनात कुठली शंका ठेवू नका, लसीमुळे कुठलाही त्रास होत नाही. फ्रंट लाईन कोरोना योध्दयांची कोरोना लसीसाठी प्रथम निवड केल्याबद्दल शासनाचे आभार. येत्या काही दिवसात नागरिकांना लसीकरण करण्यात येणार आहे त्यामुळे लसीकरणाबाबत संकाेच बाळगू नका.
- डॉ.राजेंद्र जैन.
......
जिल्ह्यात पहिल्याच दिवशी एकूण तीन केंद्रावरुन ३०० आरोग्य कर्मचाऱ्यांचे यशस्वीपणे लसीकरण करण्यात आले. या दरम्यान कुठलीही अडचण अथवा समस्या आली नाही. नियोजित कार्यक्रमाप्रमाणे सर्वच आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाईल.
- डॉ. नितीन कापसे, जिल्हा आरोग्य अधिकारी.
..
लसीकरण केंद्रावर केंद्र शासनाच्या सूचनेनुसार सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या जिल्ह्यातील सर्व ८४२८ फ्रंट लाईन योध्दयांना यशस्वीपणे लसीकरण केले जाईल.
- डॉ.नरेश तिरपुडे, अधिष्ठाता मेडिकल.
....
जिल्ह्यात लसीकरणाचा पहिला टप्पा यशस्वीपणे पूर्ण केला जाईल. १० हजार २६० लस उपलब्ध झाल्या आहेत. यानंतर मोहिमेचा दुसरा टप्पा देखील यशस्वी केला जाईल.
- दीपक कुमार मीना, जिल्हाधिकारी.