शेवटच्या नागरिकाला अल्प खर्चात न्याय मिळावा
By Admin | Published: January 17, 2017 12:54 AM2017-01-17T00:54:14+5:302017-01-17T00:54:14+5:30
वकीलांनी पक्षकारांची बाजू मांडताना ती न्यायिक अधिकाऱ्यांना समजेल अशा सोप्या भाषेत मांडली पाहिजे.
न्यायमूर्ती गवई : दिवाणी न्यायालयाच्या इमारतीचे उद्घाटन
अर्जुनी-मोरगाव : वकीलांनी पक्षकारांची बाजू मांडताना ती न्यायिक अधिकाऱ्यांना समजेल अशा सोप्या भाषेत मांडली पाहिजे. न्यायनिवाडे ज्यांच्यासाठी लिहिण्यात येतात ते संबंधित पक्षकारांना देखील समजले पाहिजे. शेवटच्या नागरिकाला कमी वेळात व अल्प खर्चात न्याय मिळवून देवूनच सामाजिक आणि आर्थिक समता स्थापन करण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण पाऊल टाकले जाईल, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केले.
येथील दिवाणी (कनिष्ठ स्तर) न्यायालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन न्या.गवई यांनी केले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. नागपूर खंडपिठाचे न्या.प्रदीप देशमुख, खा.नाना पटोले यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर होते. मंचावर दिवाणी न्यायाधीश स्वप्नील रामटेके, तालुका वकील संघाचे अध्यक्ष पोमेश रामटेके यांची उपस्थिती होती.
यावेळी न्या.देशमुख म्हणाले, पूर्वी न्यायालयाचे कामकाज अनेक ठिकाणी तप्त ऊन्हाच्या वातावरणात भाडयाच्या इमारतीत चालत असायचे. आज मात्र न्यायालयाच्या इमारती चांगल्या व दर्जेदार होत आहेत. या इमारतींची देखभाल दुरूस्ती तसेच साफसफाई करण्यासोबतच न्यायालयाचे कामकाज देखील प्रभावी झाले पाहिजे. न्यायालयात प्रकरणे प्रलंबित राहणार नाही याची न्यायिक अधिकाऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे. न्यायालयाने पक्षकारांना तारखांची पूर्वकल्पना दिली तर त्यांची गैरसोय होणार नाही. जिथे न्यायालयाच्या इमारती नाहीत, तेथे इमारती बांधण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी न्या.गवई यांच्या हस्ते पाऊणेचार कोटी रु पये खर्चून बांधलेल्या दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) न्यायालयाच्या इमारतीचे फित कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी इमारतीची पाहणी केली. इमारत बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत गाणार व कंत्राटदार पुगलिया यांचे प्रतिनिधी यांचा न्या. गवई यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.
जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष टी.बी.कटरे, अर्जुनी मोरगावच्या नगराध्यक्ष पोर्णिमा शहारे, जिल्हा न्यायालयाच्या प्रबंधक नलिनी भारद्वाज, तालुका वकील संघाच्या वतीने रामटेके, कापगते, पालीवाल, बनपुरकर, भाजीपाले, परशुरामकर यांनी मान्यवरांचा पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देवून सत्कार केला.
कार्यक्रमाला जिल्हयातील न्यायिक अधिकारी, वकील बांधव, न्यायालयातील कर्मचारी, तालुक्यातील पोलीस पाटील व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन सहदिवाणी न्या.साठे यांनी तर उपस्थितांचे आभार अवचटे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)
झुडूपी जंगलाचा प्रश्न खासदारांनी सोडवावा
यावेळी न्या.गवई म्हणाले, भारतीय संसदेने भारतीय वन कायद्यात सुधारणा केली तर झुडूपी जंगलाचे प्रश्न देखील मार्गी लागतील असे सांगून विदर्भातील खासदारांची या प्रश्नांच्या सोडवुणकीसाठी एकजूट करावी व खा.पटोले यांनी हा प्रश्न सोडवावा, असे ते म्हणाले.
खा.पटोले म्हणाले, अर्जुनी/मोरगाव येथे न्यायालयाच्या इमारतीची प्रतीक्षा आजच्या उद्घाटनामुळे संपली आहे. विदर्भातील झुडूपी जंगलांच्या प्रश्नामुळे अनेक ठिकाणी जागा असूनसुध्दा इमारती बांधता आल्या नाहीत. न्यायालयाची ईमारत चांगली ठेवण्याचे काम तालुका वकील संघ, न्यायालयीन अधिकारी कर्मचारी व पक्षकारांचे आहे.