मिस्ट कुलिंग सिस्टम ‘कधी आॅन तर कधी आॅफ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 10:04 PM2018-04-16T22:04:03+5:302018-04-16T22:04:03+5:30
उन्हाळ्याच्या दिवसांत प्रवाशांसह रेल्वे कर्मचाऱ्यांच्या अंगाची लाही-लाही होते. या समस्येचे निवारण करण्यासाठी ५० लाख रूपयांच्या कुलिंग सिस्टमला मंजुरी देवून २०१५ मध्ये ही प्रणाली गोंदिया स्थानकावर सुरू करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा यावर्षी एप्रिल महिन्यापासून ही प्रणाली सुरू करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : उन्हाळ्याच्या दिवसांत प्रवाशांसह रेल्वे कर्मचाऱ्यांच्या अंगाची लाही-लाही होते. या समस्येचे निवारण करण्यासाठी ५० लाख रूपयांच्या कुलिंग सिस्टमला मंजुरी देवून २०१५ मध्ये ही प्रणाली गोंदिया स्थानकावर सुरू करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा यावर्षी एप्रिल महिन्यापासून ही प्रणाली सुरू करण्यात आली आहे. मात्र ही कुलिंग सिस्टम ‘कधी आॅन तर कधी आॅफ’ राहत असल्याने प्रवाशांच्या अंगाची लाही लाही होत आहे.
प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वे स्थानक प्रशासनाने मिस्ट कुलिंग सिस्टमला सुरूवात केली. उन्हाळ्यात ४८ अंशापर्यंत पोहोचणारे तापमान २५ ते ३० अंशापर्यंत कुलिंग सिस्टममुळे आणण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे रेल्वे स्थानकातील प्रवाशांसह रेल्वे कर्मचाºयांनाही गारवा मिळणार होता. मात्र सदर सिस्टम संचालित करणाºया कर्मचाºयांच्या दुर्लक्षित धोरणामुळे प्रवाशांना त्याचा लाभ योग्यरित्या मिळत नसल्याचे चित्र आहे. यात फव्वारा निघणाºया यंत्रांची देखभाल, दुरूस्ती करणे आवश्यक आहे. गोंदियाचे रेल्वे स्थानक ‘अ’ श्रेणीत असून वर्षाकाठी सहा कोटींचा महसूल या स्थानकातून प्राप्त होतो. मध्यवर्ती व महत्त्वाचे स्थानक असल्याचा बहुमानही या स्थानकाला आहे. येथून मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि चंद्रपूरच्या दिशेने धावणाºया गाड्यांतून हजारो प्रवाशी प्रवास करतात. प्रवाशांना अत्याधिक सुविधा पुरविण्यासाठी रेल्वे प्रशासनाचे प्रयत्न सुरू असल्याने मागील पाच वर्षांपासून स्थानकाच्या सौंदर्यात भर पडत आहे. फलाटांची संख्या सुद्धा वाढली आहे. यापैकी एक सुविधा म्हणजे कुलिंग सिस्टम आहे.
उष्णतेमुळे उन्हाळ्यात प्रवाशांचे हाल होवू नये, यासाठी ५० लाख रूपयांच्या खर्चातून कुलिंग सिस्टिम सुरू करण्यात आले होते. प्रत्येक फलाटावर असलेल्या पंख्यांना थंड पाण्याचे पाईप जोडण्यात आले आहेत. पंखे सुरू झाल्यानंतर फलाटावर गाडी येण्याच्या अर्धा तास पूर्वीपासून पाणी सोडण्यात येणार होते.
मात्र आता अर्धा तास तर सोडाच, गाडी येण्याच्या दोन मिनिटांपूर्वीसुद्धा कुलिंग सिस्टिम सुरू केले जात नाही. परिणामी सुविधा असूनही उष्णतेची झळ प्रवाशांना सहन करावी लागते. संपूर्ण देशभरात अशाप्रकारचा प्रयोग बिलासपूर व रायपूर येथील स्थानकांवर करण्यात आला होता. गोंदियातील प्रयोग देशातील तिसरे आणि राज्यातील पहिलाच. मात्र आता एप्रिल महिना संपण्याच्या मार्गावर असताना मिस्ट कुलिंगचा लाभ मिळत नसल्याचे चित्र आहे.
स्थानकाला हायफाय करण्याची गती मंदावली
अनेक योजनांच्या माध्यमातून गोंदिया स्थानकाला ‘हायफाय’ करण्याचे प्रयत्न असल्याचे लोकप्रतिनिधी सांगतात. जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची माहिती देणारे फलक रेल्वे स्थानक परिसरात नि:शुल्क लावण्याची सुविधा करण्यात येणार होती. लिफ्टची सोय तीन फलाटांवर करण्यात आली. मात्र एक्सलेटरची सोय अद्याप उपलब्ध झाली नाही. आॅगस्ट २०१७ मध्ये एक्सलेटरचे काम पूर्ण झाले. याला आठ महिन्याचा कालावधी लोटत असताना एस्कलेटरचे अद्याप लोकार्पण करण्यात आले नाही.