पोलिसांच्या वसाहतींना अखेरची घरघर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 11:29 PM2018-12-12T23:29:07+5:302018-12-12T23:29:31+5:30
घरासमोर कचराकुंड्या नाही, सर्वदूर कचरा, खिड्यांचे काच फुटलेले, शुद्ध पाण्याची सोय नाही, हे जळजळीत वास्तव एखाद्या झोपडपट्टीवासीयांचे नव्हे तर गोरेगाव पोलिसांच्या वसाहतीचे आहे.
दिलीप चव्हाण ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : घरासमोर कचराकुंड्या नाही, सर्वदूर कचरा, खिड्यांचे काच फुटलेले, शुद्ध पाण्याची सोय नाही, हे जळजळीत वास्तव एखाद्या झोपडपट्टीवासीयांचे नव्हे तर गोरेगाव पोलिसांच्या वसाहतीचे आहे. प्रशासनाच्या कायम दुर्लक्षित धोरणामुळे गोदावरी, गंगा, यमुना, सरस्वती या नावाच्या पोलीस वसाहती अखेरच्या घटका मोजत असल्याचे चित्र आहे.
दहा वर्षापूर्वी गोरेगाव पोलीस स्टेशनच्या मागे पोलीस कुटुंबियांना राहण्यासाठी वसाहतीची निर्मिती करण्यात आली. ५० पोलीस कुटुंबांना राहता यावे या दृष्टीकोनातून या वसाहतीचे बांधकाम करण्यात आले. पण कमी जागेत बांधकाम करण्यात आल्याने घरात राहायचे कसे या प्रश्नाचे उत्तर मात्र कुणाकडेच नाही. पोलिसांच्या घरी कुणी पाहुणा आला तर पाहुण्यांची व्यवस्था कुठे करायची, हा प्रश्न वसाहतीतील कुटुंबांसमोर निर्माण होतो. एक हॉल, एक किचन, संडास बाधरुम ऐवढेच बांधकाम एका कुटुंबासाठी करण्यात आले आहे.
एवढ्या कमी जागेत वावर कसा करायचा असा प्रश्न या वसाहतीत राहणाऱ्या कुटुंबीयांना सुरूवातीपासूनच सतावित आहे. मात्र याला पर्याय नसल्याने या गैरसोयीचा सामना करीत पोलिसांचे कुटुंब वसाहतीमध्ये वास्तव्य करीत आहे. तर काही कुटूंब भाड्याने घर घेवून राहत आहेत. या वसाहतीत १५ ते २० कुटुंब वास्तव करतात. मात्र कुठेही कचरा कुंड्या नाहीत, सर्वत्र कचरा पसरलेला आहे. नगर परिषदेची घंटागाडीही या वसाहतीत येत नाही. शुद्ध पाण्याचा बिकट प्रश्न आहे.
प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन ठिकठिकाणी फुटली असल्यामुळे पोलीस वसाहतीत पाणीच पोहोचत नाही.जे पाणी पोहचते ते सुध्दा खूप गढूळ आहे. येथील पोलीस कुटुंबीय पाणी विकत घेतात. वसाहतीतील घराच्या काचा फुटलेल्या आहेत. कुठे विटाचे थर लावून तर कुठे कागद लावून पोलिसांनी तात्पुरती व्यवस्था केली आहे. दोन वर्षांपासून या वसाहतींना साधे पेन्टींग करण्याचे औदार्य ही प्रशासनाने दाखविले नाही. पोलीस आपल्या कुटुंबियांना व्यवस्था नसलेल्या या वसाहतीत ठेवून २४ तास कर्तव्य बजावतात. मात्र त्यांच्या या घराची दयनिय अवस्था मान खाली घालायला लावणारी आहे. तसेच अंतर्गत रस्तेही उखडलेले असून ठिकठिकाणी गिट्टी उखडलेली आहे.
रस्ते, पाणी, खिड्यांचे काच, पेन्टींग, कचऱ्याकुंड्या या मुलभूत सुविधा पुरविण्यात यावे, अशी मागणी पोलिसांच्या कुटुंबीयांची आहे. कुठेही, काही घटना घडली तर पोलिसांना प्रथम पाचारण केले जाते. राजकीय भांडण असो वा सार्वजनिक, प्रत्येकवेळी पोलिसांची भूमिका महत्वपूर्ण राहते. पण त्याच पोलीस कुटुंबीयांच्या राहणीमानाची कुणालाच काळजी नाही.राजकारणीही कधी विचारपूस करीत नाही. आजवरी तरी कुणीही सत्तेतील नेत्यांनी पोलीस वसाहतीतील समस्येकडे लक्ष दिले नसल्याची खंत एका पोलीस कर्मचाºयांनी नाव न सांगण्याच्या अटीवर लोकमतजवळ व्यक्त केली.