तीन बसफेऱ्यांचा शुभारंभ
By admin | Published: January 20, 2015 12:08 AM2015-01-20T00:08:02+5:302015-01-20T00:08:02+5:30
जिल्हा ते तालुका बसफेऱ्या नसल्याची ओरड अर्जुनी-मोरगाववासी अनेक दिवसांपासून करीत होते. रेल्वेचा प्रवास स्वस्त असूनही रेल्वेच्या वेळा बरोबर नसल्याने अर्जुनी-मोरगाववासीयांना
गोंदिया : जिल्हा ते तालुका बसफेऱ्या नसल्याची ओरड अर्जुनी-मोरगाववासी अनेक दिवसांपासून करीत होते. रेल्वेचा प्रवास स्वस्त असूनही रेल्वेच्या वेळा बरोबर नसल्याने अर्जुनी-मोरगाववासीयांना गोंदियाला ये-जा करण्यात मोठीच अडचण निर्माण होत होती. ही बाब हेरून गोंदिया आगाराने येत्या बुधवारपासून (दि.२१) गोंदिया-अर्जुनी/मोरगाव-लाखांदूर या मार्गावर तीन बसफेऱ्या सुरू करण्याचे ठरविले आहे.
अर्जुनी-मोरगाव बस स्थानकाचे नुकतेच पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यामुळे या तिन्ही बसफेऱ्या सुरळीत संचालित होण्यासाठी अडचण निर्माण होणार नसल्याचे गोंदियाचे आगार व्यवस्थापक गौतम शेंडे यांनी सांगितले.
पहिली बस गोंदिया आगारातून सकाळी ९ वाजता, दुसरी बस दुपारी २.४५ वाजता तर तिसरी बस सायंकाळी ५.३० वाजता अर्जुनी-मोरगावसाठी सुटणार आहेत. तसेच परतीच्या प्रवासात गोंदियासाठी या बसेस अर्जुनी-मोरगाववरून सकाळी ७ वाजता, दुपारी १२ वाजता व सायंकाळी ५ वाजता सुटतील. गोंदिया आगारातून अर्जुनी-मोरगावसाठी सायंकाळी ५.३० वाजता सुटणारी बस सायंकाळी ७.४५ वाजता अर्जुनीवरून लाखांदूरसाठी सुटेल व लाखांदूरला मुक्कामी राहील. यानंतर ती बस सकाळी ७.१५ वाजता लाखांदूरवरून सुटेल व सकाळी ७.४५ वाजता अर्जुनी-मोरगावला पोहचेल. तिथून सकाळी ८ वाजता गोंदियासाठी सुटेल.गोंदिया ते अर्जुनी-मोरगाव ये-जा करण्यासाठी सरळ बसफेऱ्या नसल्याने प्रवाशांची मोठीच गैरसोय होत होती. शिवाय या बसफेऱ्यांसाठी अनेक दिवसांपासून प्रवाशांची मागणी होती.