एनआरसी कक्षाला लागले कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 10:29 PM2018-05-17T22:29:22+5:302018-05-17T22:29:22+5:30
येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयात पोषण आहार पुनर्वसन केंद्र (एनआरसी) सुरू करण्यात आले होते. या केंद्रात जिल्ह्यातील कुपोषीत बालकांना दाखल करुन त्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न केले जात होते. मात्र ८ मे पासून जिल्ह्यातील एनआरएचएम कर्मचारी संपावर असल्याने या केंद्राला कुलूप लावण्याची वेळ येथील आरोग्य प्रशासनावर आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयात पोषण आहार पुनर्वसन केंद्र (एनआरसी) सुरू करण्यात आले होते. या केंद्रात जिल्ह्यातील कुपोषीत बालकांना दाखल करुन त्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न केले जात होते. मात्र ८ मे पासून जिल्ह्यातील एनआरएचएम कर्मचारी संपावर असल्याने या केंद्राला कुलूप लावण्याची वेळ येथील आरोग्य प्रशासनावर आली आहे.
मागील दोन तीन दिवसांपासून या केंद्राला कुुलूप लावण्यात आल्याची माहिती आहे. प्राप्त माहितीनुसार १६ मे ला ८ कुपोषित बालकांना पोषण आहार पुनर्वसन केंद्रात दाखल करण्यासाठी आणण्यात आले होते. मात्र कर्मचारी नसल्याने त्यांना दाखल करुन घेण्यास नकार देत घरी पाठविण्यात आल्याची माहिती आहे. एनआरएचएम कर्मचाऱ्यांच्या संपाचा सर्वाधिक फटका येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयातील रुग्णांना बसत आहे. बुधवारी (दि.१६) कर्मचाऱ्यांअभावी नवजात बाल अतिदक्षता कक्षातील तीन बालकांना नागपुर येथे रेफर करण्यात आल्याची माहिती आहे. मागील दोन तीन दिवसांपासून येथील रुग्णांना रेफर टू नागपुर केले जात असल्याचे चित्र आहे. एनआरएचएम कर्मचाऱ्यांच्या संपामुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवा कोलमडली आहे. संपाचा सर्वाधिक फटका येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयाला बसला आहे. संपामुळे नवजात बाल अतिदक्षता विभागातील सेवा पूर्णपणे ठप्प झाली असून इतर विभागावर सुध्दा थोड्या फार प्रमाणात परिणाम झाला आहे. रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी पुरेशा प्रमाणात आहेत. मात्र परिचारीकांची संख्या फार कमी आहे. परिचारीकांची ६८ पदे मंजूर असून त्यापैकी २८ परिचारिका सध्या कार्यरत आहे. त्यामुळे या परिचारिका तीन पाळीत काम करतात. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अद्यापही परिचारिकांची पदे भरण्यात आली नाही. त्यामुळे एनआरएचएम अंतर्गत परिचारिकांची पदे भरुन सेवा घेण्यात येत होती. मात्र एनआरएचएम कर्मचारी संपावर गेल्याने रुग्णालयाची आरोग्य सेवा पूर्णपणे कोलमडली आहे. त्यामुळे येथील रुग्ण आणि बालकांना नागपुर रेफर केले जात आहे. प्राप्त माहितीनुसार बाई गंगाबाई महिला रुग्णालयात दररोज १५० रुग्ण दाखल होतात. बाह्यरुग्ण तपासणी विभागात दोनशेच्यावर रुग्णांची तपासणी केली जाते.
दररोज ३० ते ३५ गर्भवती महिलांना दाखल केले जात असून यापैकी १५ ते २० महिलांवर सिजर शस्त्रक्रिया केली जाते. यात परिचारिकांची मदत महत्त्वपूर्ण असते. मात्र त्या संपावर गेल्या असल्याने २८ परिचारिकांच्या मदतीने कामे सांभाळताना वैद्यकीय अधिकाऱ्यांवर ताण येत असल्याचे चित्र आहे. या रुग्णालयात एनआरएचएम अंतर्गत ४७ कर्मचारी सेवा देत असून त्यामध्ये २० परिचारिकांचा समावेश आहे.