गराडा येथील प्राथमिक शाळेला लावले कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 09:32 PM2018-01-04T21:32:31+5:302018-01-04T21:32:53+5:30
पंचायत समिती गोरेगाव अंतर्गत येणाऱ्या गराडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला बुधवारी(दि.३) क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या दिवशीच स्थानिक शिक्षण विभागाने कुलूप लावले.
दिलीप चव्हाण।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : पंचायत समिती गोरेगाव अंतर्गत येणाऱ्या गराडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला बुधवारी(दि.३) क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या दिवशीच स्थानिक शिक्षण विभागाने कुलूप लावले. त्यामुळे पालकांनी रोष व्यक्त करीत पाल्यांना शाळेतच न पाठविण्याचा पावित्रा घेतला आहे.
महात्मा जोतीबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी अनेकांची टिका टिपणी व हालअपेष्टा सहन करुन शाळा उघडून ज्ञानाचे भंडार उघडले. तसेच विद्यार्थ्यांना संस्कारीत केले. मात्र प्रशासनाने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या दिवशी गराडा येथील शाळेला कुलूप ठोकले. त्यामुळे पालकांमध्ये रोष व्याप्त आहे. गराडा हे घनदाट जंगलात वसलेले असून हे गाव कोअर क्षेत्र बफर झोनमध्ये येते. या शाळेत २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात पहिली, दुसरी व चौथ्या वर्गात एकूण आठ विद्यार्थी शिक्षण घेत होते. तर २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात पहिली, दुसरी व तिसऱ्या वर्गात एकूण ११ विद्यार्थी होते.
गराडा प्राथमिक शाळेतील २०१७-१८ या शैक्षणीक वर्षातील ११ विद्यार्थ्याची प्राथमिक शाळा मुंडीपार शाळेत समायोजीत करण्यात येणार असल्याची माहिती आहे. परंतु मुंडीपार प्राथमिक शाळा गराडावरुन ३ किलोमीटर अंतरावर आहे. परिणामी तीन किलोमीटर अंतर पहिली व दुसरीचे विद्यार्थी पायी कसे जातील असा प्रश्न गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे. शालेय व्यवस्थापन समिती गराडाने एक ठराव घेवून जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी यांना पत्र देऊन शाळा बंद न करण्याची विनंती केली होती. मात्र शिक्षण विभागाने शासन आदेशाचे पालन करीत बुधवारी (दि.३) शाळा बंद केली. गराडा शाळेतील शिक्षक आनंद गौपाले व शिक्षीका अनिता तुरकर यांचे मुंडीपार प्राथमिक शाळेत समायोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात गटशिक्षणाधिकारी यशवंत कावळे यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधला असता त्यांनी शासनाच्या आदेशानुसार शाळा बंद करण्यात आल्याचे सांगितले.
पालकांच्या विनंतीकडे दुर्लक्ष
ज्या शाळेची पटसंख्या १० च्या आत असेल तर त्या शाळेतील विद्यार्थ्याना एक किमीच्या आतील चांगली गुणवत्ता असणाºया शाळेत समायोजीत करण्यात यावे असे आदेश आहे. मात्र सत्र २०१७-१८ या वर्षात या शाळेत ११ विद्यार्थी शिक्षण घेत असताना गराडा येथील शाळा बंद करण्यात आली. विषेश म्हणजे ही शाळा बंद करु नये असे पत्र विद्यार्थ्यांच्या पालकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दिले होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
शिक्षण समितीच्या ठरावाचे काय
जिल्हा परिषद शिक्षण सभापती पी.जी.कटरे यांनी शैक्षणिक सत्र संपल्याशिवाय कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्यात येणार नाही, अशी ग्वाही दिली होती.जि.प.शिक्षण समितीच्या सभेत त्या संदर्भात ठराव सुध्दा पारित करण्यात आला होता. मात्र यानंतरही कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्यात आल्याने पारित ठरावाचे काय असा सवाल उपस्थित केला जात आहे.
गराडा हे गाव कोअर क्षेत्र बफर झोनमध्ये येते. शाळा बंद केल्यामुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होईल. या गावाजवळ प्राथमिक शाळा नाही, मुंडीपार शाळा तीन किलोमीटर आहे. त्यामुळे आम्ही गावकरी शाळेतच मुलांना पाठविणार नाही.
शशेंद्र भगत
सरपंच, ग्रा.पं.मुरदोली (गराडा)