जन्मापासून मृत्यूपर्यंत कायद्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 08:45 PM2019-03-14T20:45:43+5:302019-03-14T20:47:59+5:30
प्रत्येकाला अधिकार मिळावा, समाजात वावरताना कुणावरही अन्याय होता कामा नये. प्रत्येकाला त्याच्या मूलभूत हक्कापासून वंचित केले जाऊ नये. कायद्याच्या चाकोरीतूनच उत्तम समाज निर्मिती व्हावी. महिलांना समाजात सन्मान मिळावा. कायदे मनुष्याच्या हितासाठीच झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : प्रत्येकाला अधिकार मिळावा, समाजात वावरताना कुणावरही अन्याय होता कामा नये. प्रत्येकाला त्याच्या मूलभूत हक्कापासून वंचित केले जाऊ नये. कायद्याच्या चाकोरीतूनच उत्तम समाज निर्मिती व्हावी. महिलांना समाजात सन्मान मिळावा. कायदे मनुष्याच्या हितासाठीच झाले आहेत. प्रत्येक नागरिकांनी कायद्याचा दुरुपयोग होणार नाही याची दक्षता घेण्याची गरज आहे. समाजात वावरणाऱ्या प्रत्येकाला जन्मापासून मृत्यूपर्यंत कायद्याची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन अर्जुनी-मोरगाव येथील दिवानी न्यायाधीश स्वप्नील रामटेके यांनी केले.
बोंडगावदेवी येथील सार्वजनिक रंगमंदिरात मंगळवारी लोकअदालत आयोजित करण्यात आली होती. या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. तालुका विधी सेवा समिती, वकील संघ, ग्रामपंचायतच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मार्गदर्शक म्हणून ठाणेदार अनिल कुंभरे, तालुका वकील संघाचे अध्यक्ष श्रीकांत वनपूरकर, अॅड.पोमेश्वर रामटेके, अॅड. गौरीशंकर अवचटे, अॅड.एम.एम. भाजीपाले, अॅड. टी.डी.कापगते व सरपंच राधेशाम झोळे, उपसरपंच वैशाली मानकर, पोलीस पाटील मंगला रामटेके उपस्थित होते. उपस्थित पक्षकार व सामान्य जनतेला कायदेविषयक मार्गदर्शन करताना अॅड.श्रीकांत बनपूरकर म्हणाले,समाजामध्ये वावरणाऱ्या प्रत्येक मानवाला कायद्याच्या माहितीसह जाणीव जागृती व्हावी, गरजू वंचितांना कायद्याचे पाठबळ मिळावे यासाठी विधी सेवा समितीच्या वतीने फिरते न्यायालयाचे उपक्रम राबविले जात आहे. ठाणेदार अनिल कुंभरे यांनी कायद्याच्या चाकोरीत राहूनच जीवन जगावे. कायदा हातात घेऊ नये. कायद्याच्या विरोधात जावून कुणीही कृत्य करु नये असे सांगितले. अॅड. भाजीपाले यांनी कायदे मनुष्याच्या रक्षण व हितासाठी बनविण्यात आले आहे. त्यांनी पोटगी, मुलींचा वारसान हक्क व आधुनिक तंत्रज्ञानसंबंधी जाणीव करुन दिली. अॅड. गौरीशंकर अवचटे यांनी लोकहितार्थ कल्याणासाठी विविध कायद्याची निर्मिती झाल्याचे सांगितले. सामोपचाराने तंट्यांचा निपटारा लोक अदालतीमधून करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. अॅड. कापगते यांनी प्रत्येकाला कायद्याची गरज आहे. जन्मापासून ते मरेपर्यंत मनवाला कायद्याची गरज असल्याचे सांगितले. दैनंदिन व्यवहारातील कायद्याची माहिती सामान्य जनतेला व्हावी. यासाठी फिरते न्यायालयाच्या माध्यमातून गावापर्यंत उपक्रम राबविले जात आहे. प्रास्ताविक अॅड. श्रीकांत बनपूरकर यांनी मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज पालीवाल यांनी केले तर आभार ग्रामविकास अधिकारी पी.एम. समरीत यांनी मानले. लोक अदालतीत परिसरातील न्यायालयीन प्रकरण आपसी निपटाºयासाठी ठेवण्यात आली होती. वादी-प्रतिवादींना समझोत्याने वाद सोडविण्यास प्रोत्साहित करण्यात आले.