नातू झाला तरी सासरी छळ सुरूच ; ग्रामीण भागात तक्रारी जास्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:38 AM2021-06-16T04:38:37+5:302021-06-16T04:38:37+5:30
गोंदिया : कौटुंबिक कारणातून पतीकडून व सासरच्याकडून पत्नीचा छळ होत आहे. नातू झाला असला तरी महिलांचा छळ सुरूच ...
गोंदिया : कौटुंबिक कारणातून पतीकडून व सासरच्याकडून पत्नीचा छळ होत आहे. नातू झाला असला तरी महिलांचा छळ सुरूच असल्याचेही प्रकार पुढे येत आहे. मागील दीड वर्षांत गोंदिया जिल्ह्यातील कौटुंबिक हिंसाचारच्या भादंविच्या कलम ४९८ अंतर्गत २५ तक्रारी गोंदिया पोलिसांकडे आल्या आहेत. सन २०२० या वर्षात १२ तक्रारी करण्यात आल्या होत्या. परंतु सन २०२१ च्या सहा महिन्यात १३ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. भरोसा सेलकडून अशा दांपत्याचे समूपदेशन करण्यात येत आहे. देशात कोरोनाचे संकट असतांना या काळात कुटुंबं एकत्रित आलीत. लैंगिक समानता मानणाऱ्या देशात स्त्रियांवर कौटुंबिक अत्याचार होत आहे.
...................
पन्नाशी ओलांडली तरी भांडणे सुरूच
१) लग्न होऊन सासरी आलेल्या महिलांनी मुले जन्माला घातली त्या मुलांचे लग्न करून नातवंडे जन्माला आलीत तरी म्हाताऱ्यांचा छळ सद्यस्थितीत सुरूच आहे.
२) वर्षानुवर्षापासून स्त्रींयांना दाबूनच ठेवले जात असल्याने समाजात त्यांना घराच्या बाहेर पडण्याचा अधिकार दिला जात नाही. आजही दाराचा उंबरठा महिलेने ओलांडू नये, घरातल्या घरातच त्यांना ठेवले जाते.
३) नवरा जून्या विचारांचा, सासरचे वृध्द मंडळी असली तर ते त्या महिलांना आजही अपमानास्पद वागणूक देत असल्याची समाजात अनेक उदाहरणे आहेत.
........................
२०२० मध्ये जिल्ह्यात कलम ४९८
अंतर्गत दाखल गुन्हे-१२
शहरी भागात-२
ग्रामीण भागात-१०
मे २०२१ पर्यंत जिल्ह्यात कलम ४९८
अंतर्गत दाखल गुन्हे-१३
शहरी भागात-१
ग्रामीण भागात-१२
........................
काय म्हणतात महिला...
१) पुरूषप्रधान संस्कृतीत स्त्रीला दुय्यम दर्जाच मिळत आहे. बाजारातल्या इतर वस्तू सारखी स्त्रीला आजही वस्तू समजली जाते. तिला भावना नसतांना असे म्हटले जाते. एक तर तिला दासी नाही तर देवी म्हणून स्वीकारतात. देवी किंवा दासी नको तर महिलांना माणूस म्हणूनच वागवा.
सविता बेदरकर, सामाजिक कार्यकर्ता गोंदिया.
.......................
२) समाजात स्त्रीला पुरूषाच्या बरोबरीचे स्थान द्यायला हवे. एकीकडे स्त्रीयांवर अत्याचार तर दुसरीकडे स्त्रीया पुरूषांवर अत्याचार करतात. हा समाजातील असमतोलपणा नष्ट करण्यासाठी सर्वच समान अशाच भावनेने वागविले पाहिजे.
- तेजस्वीनी योगेश खोटेले, डोंगरगाव (सडक-अर्जुनी)