पाइपलाइन रस्त्याच्या बाजूने टाका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:25 AM2021-04-03T04:25:36+5:302021-04-03T04:25:36+5:30
सुकडी डाकराम : धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा-२ ची पाइपलाइन बोदलकसा तलावात पाणी टाकण्यासाठीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सुकडी ...
सुकडी डाकराम : धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा-२ ची पाइपलाइन बोदलकसा तलावात पाणी टाकण्यासाठीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सुकडी डाकराम येथून ही पाइपलाइन टाकताना रस्त्याच्या बाजूने टाकण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी आ. विजय रहांगडाले यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
धापेवाडा उपसा सिंचन टप्पा-२ चे काम युद्धपातळीवर सुरू आहे. चोरखमारा व बोदलकसा तलावात पाणी टाकण्यासाठी पाइपलाइन टाकली जात आहे. चोरखमाराचे काम ९९ टक्के झाले असून, बोदलकसा पाइपलाइनचे काम ९० टक्के झाले आहे. केवळ सुकडी डाकराम ते पिंडकेपार या अर्धा किलोमीटरचे काम शिल्लक आहे. बोदलकसा तलावात पाणी टाकण्यासाठी पाइपलाइन ही रस्त्याच्या बाजूने नेण्याचे ठरविण्यात आले होते. यासाठी रस्त्याच्या बाजूला असलेल्या अतिक्रमणधारकांनासुद्धा नोटीस मिळाली होती. काही लोकांनी अतिक्रमण हटविले होते. मात्र, संबंधित विभागाच्या वतीने पाइपलाइन शेतातून जाणार आहे, असे सांगण्यात आले. त्यानंतर ग्रा.पं. सुकडीने ठराव घेऊन पाइपलाइन रोडच्या बाजूने नेण्यात यावी, असा ठराव घेऊन संबंधित विभागाकडे पाठविण्यात आला. त्यानंतर धापेवाडा उपसा सिंचन विभागामार्फत रस्त्याचे मोजमाप करण्यात आले. २६ फेब्रुवारीला तहसील कार्यालय, तिरोडा येथे उपविभागीय अधिकाऱ्यांनी समन्वय बैठक घेऊन शेतकऱ्यांना बोलाविले होते. तेव्हा रस्त्याच्या बाजूने पाइपलाइन टाकण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. त्याच मागणीवर शेतकरी ठाम असून, शेतातून पाइपलाइन टाकण्याच्या कामाला विरोध केला आहे. या मागणीचे निवेदनसुद्धा आ. विजय रहांगडाले यांना देण्यात आले. शिष्टमंडळात शेतकरी गोपाल ठाकरे, कमला सूर्यवंशी, सदाशिव झेगेकार, मुका धुर्वे, सीताराम राऊत, नथ्थू कुर्वे, इंदू पटले, संजय चंद्रिकापुरे, प्रकाश उईके, लांजेवार, लतिका खोब्रागडे, रवी कुंभारे, आशा हमदापुरे, राजेश्वर बोरकर, वाल्मीक गभणे, दयाराम सूर्यवंशी, शिवचरण बोरकर, रिताश्री बावनथडे, रेखा बावनथडे यांचा समावेश होता.