मातेला चढविणार ११ तोळ्यांचा राणीहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 09:36 PM2018-10-15T21:36:22+5:302018-10-15T21:36:42+5:30
भाविकांच्या नवसाला पावणारी माता म्हणून येथील इंगळे चौकातील दुर्गा देवीची ख्याती आहे. याची प्रचिती यंदाही आली असून मनोकामना पूर्ण झाल्याने दोन भाविकांनी चांदीचे दोन ताट चढविले असतानाच आता एक भाविक मातेला ११ तोळ्यांचा सोन्याचा राणीहार चढविणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : भाविकांच्या नवसाला पावणारी माता म्हणून येथील इंगळे चौकातील दुर्गा देवीची ख्याती आहे. याची प्रचिती यंदाही आली असून मनोकामना पूर्ण झाल्याने दोन भाविकांनी चांदीचे दोन ताट चढविले असतानाच आता एक भाविक मातेला ११ तोळ्यांचा सोन्याचा राणीहार चढविणार आहे.
सिव्हील लाईन्स इंगळे चौकातील दुर्गा स्थापनेला यंदा ५० वर्षे झाली. हे ५० वर्ष समितीकडून लोकोत्सवाच्या स्वरूपात साजरे केले जात असून यंदाची भव्यता काही औरच आहे. त्यामुळे भाविकांची अधिकच गर्दीही येथे मातेच्या दर्शनासाठी होऊ लागली आहे.
भाविकांची मनोकामना पूर्ण करणारी येथील माता म्हणून दुर्गा मातेची ख्याती असून मागील वर्षी एका भाविकाने चांदीच्या चरण पादुका अर्पण केल्या होत्या. आता २ दिवसांपूर्वी नागपूर आणि गोंदिया येथील भाविकांनी चांदीचे २ ताट आणि २ समया अर्पण केल्या होत्या.
तर एका भाविकाने चांदीचे छत्र अर्पण केले. त्यातच आता, मातेची कृपा झालेल्या एका भाविकाने मातेला ११ तोळ््यांचा सोन्याचा राणीहार अर्पण करण्याची इच्छा समितीकडे व्यक्त केली आहे. अष्टमीच्या बुधवारी (दि.१७) सायंकाळी ७.३० वाजता हा हार मातेला अर्पण करण्यात येणार आहे.
यावेळी भाविकांनी उपस्थित राहून देवीचा आशीर्वाद घ्यावा, असे समितीच्यावतीने कळविण्यात आले आहे.