जगावर प्रभुत्व मिळविण्यासाठी इंग्रजी शिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 09:20 PM2019-02-10T21:20:10+5:302019-02-10T21:21:55+5:30
वैश्विक ज्ञानाचे आदानप्रदान मोठ्या तीव्रतेने आजच्या तंत्रज्ञानातील संगणकीय प्रणालीने होत आहे. त्यामध्ये अधिकाधिक भाषेचा वापर इंग्रजीतच होतो. जगाच्या बोलीभाषेच्या, ग्रंथसंपदेचा विचार केल्यास ७० टक्के भाषा म्हणून इंग्रजीचा स्वीकार केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सडक-अर्जुनी : वैश्विक ज्ञानाचे आदानप्रदान मोठ्या तीव्रतेने आजच्या तंत्रज्ञानातील संगणकीय प्रणालीने होत आहे. त्यामध्ये अधिकाधिक भाषेचा वापर इंग्रजीतच होतो. जगाच्या बोलीभाषेच्या, ग्रंथसंपदेचा विचार केल्यास ७० टक्के भाषा म्हणून इंग्रजीचा स्वीकार केला आहे. म्हणून आपल्या मातृभाषा व राष्ट्रभाषेसोबत अधिकाधिक महत्व इंग्रजीला द्यावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी मनोहर चंद्रिकापुरे यांनी केले.
सौंदड येथील परॉडाईज किड्स केअर व उच्च प्रायमरी इंग्लिश स्कूल मध्ये गुरूवारी (दि.७) वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले. या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन उपशिक्षणाधिकारी प्रकाश रहांगडाले यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून धनपाल रहांगडाले, भी.सी.विठ्ठले, रामेश्वर मोहबंशी, संतोष राऊत, लालचंद खडके, केशवराव यावलकर, राजश्री बडोले, देवेंद्र जनबंधू, प्रदीप मेंढे उपस्थित होते.
चंद्रिकापुरे पुढे म्हणाले, गाव खेड्यातील बालक किंवा महानगरात जन्मणाऱ्या बालकाची बुद्धी समसमान असते, परंतु सुरुवातीपासून त्यांची जडणघडण अगदी योग्य केल्यास, बुद्धिमत्तेचा विकास होऊन कालांतराने ध्येय गाठू शकतो. मराठी मातृभाषा, हिंदी राष्ट्रभाषा व इंग्रजी ही जगाची भाषा झाली आहे. वैश्विक ज्ञानाचा उद्रेक झाला असून जगातल्या प्रत्येक क्षेत्राची माहिती थोडीफार हवी. जगातील आर्थिक सुबत्ता व संधी प्राप्त करण्यासाठी या वाटेवरुन गेलेला विद्यार्थी जगाच्या बाजारपेठेत आपले स्थान निर्माण करतील.
प्रास्ताविक मुख्याध्यापिका राजश्री बडोले यांनी मांडले. संचालन रीना बडोले यांनी केले. आभार धनराज मेश्राम यांनी मानले.