मृतदेहांना भाड्याचा गारवा
By admin | Published: November 26, 2015 01:33 AM2015-11-26T01:33:55+5:302015-11-26T01:33:55+5:30
अज्ञात मृतदेह व दुर्घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तींचे मृतदेह सुरक्षित ठेवण्यासाठी शीतपेटी (मर्च्युरी कॅबिनेट) अत्यावश्यक आहे.
जुनेच मर्च्युरी कॅबिनेट : सहा महिने लोटूनही केटीएसमध्ये इन्स्टॉलेशन थंडबस्त्यात
देवानंद शहारे गोंदिया
अज्ञात मृतदेह व दुर्घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तींचे मृतदेह सुरक्षित ठेवण्यासाठी शीतपेटी (मर्च्युरी कॅबिनेट) अत्यावश्यक आहे. परंतु केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात शितपेटी इन्स्टॉलेशन झालेच नाही. गेल्या सहा महिन्यांपासून साहित्य उपलब्ध असताना सुद्धा इन्स्टॉलेशनअभावी शितपेट्यांचा उपयोग होताना दिसत नाही. परिणामी शवागारातील मृतदेहांना सुरक्षित ठेवणे कठीण झाले असून काही मृतदेहांसाठी भाड्याने शीतपेट्या मागवाव्या लागत आहे. यामुळे नाहक सरकारी तिजोरीला भुर्दंड सहन करावा लागत आहे.
गोंदिया जिल्ह्यासह राज्यभरात अनेक जिल्ह्यांसाठी ६० शीतपेट्या खरेदी करण्यात आल्या होत्या. काही ठिकाणी शीतपेट्यांचे इन्स्टॉलेशन करण्यात आले, तर अनेक ठिकाणी आतासुद्धा इन्स्टॉलेशन करण्यात आले नाही. यात गोंदिया जिल्ह्यातील केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयाचाही समावेश आहे.
शीत शवपेटी खरेदीसाठी एक कोटी १९ लाख ७० हजार रूपये खर्च करण्यात आले होते.
यासाठी हिमाचल प्रदेशच्या इस्टीम इंडस्ट्रीज कंपनीला कंत्राट देण्यात आले होते, परंतु प्रत्यक्षात गोंदियाच्या मुख्य केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात शीत शवपेटीचे इन्स्टॉलेशन झालेच शकले नाही. शीतपेटीच्या अभावामुळे रूग्णालयाच्या शवागारात मृतदेहांना अधिक वेळ ठेवणे कठीण झाले आहे.
तिरोडा-देवरीत जुन्याच शवपेट्यांचा वापर
जिल्ह्यातील देवरी ग्रामीण रूग्णालय व तिरोडा उपजिल्हा रूग्णालयात २ जुने मर्च्युरी कॅबिनेट आहे. गोंदियाच्या जिल्हा सामान्य रूग्णालय व आमगाव येथील ग्रामीण रूग्णालयात नवीन शीत शवपेट्या उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. आमगावात शीत शवपेटीचे इंस्टॉलेशन झालेले आहे व त्याचा वापरही केला जात आहे. परंतु केटीएस रूग्णालयात इंस्टॉलेशनच्या अभावाने मर्च्युरी कॅबिनेट धूळखात आहे.
केटीएस रूग्णालयात पूर्वी टू-बॉडी मर्च्युची कॅबिनेट होते, आता नवीन ४-बॉडी कॅबिनेट उपलब्ध करून देण्यात आले आहे. तिरोडा नगर परिषदेत उपलब्ध शीतपेटी अनेक दिवसांपासून बिघडलेली आहे. तिला दुरूस्त करण्यात आले होते, परंतु नंतर पुन्हा ती बिघडली आहे.
गरज मर्च्युरी कॅबिनेटची
अनेक वेळा मृतदेह दर्शनासाठी नातेवाईकांची वाट पाहात २४ तासांपर्यंत ठेवावा लागतो. अशा स्थितीत मृतदेह ठेवण्यासाठी शीतपेटीची (डेड बॉडी फ्रीजर) गरज भासते. पण शीतपेटीच्या अभावामुळे मृतदेह अधिक वेळपर्यंत ठेवणे कठिण जात आहे. कायद्यानुसार बेवारस मृतदेहाच्या शवविच्छेदनानंतर पोस्टमार्टम हाऊसमध्ये ७२ तासांपर्यंत तो ठेवावा लागतो. याचे कारण असे की, या कालावधीत मृतदेहाची ओळख व्हावी, यासाठी प्रयत्न केले जातात. मात्र पोस्टमार्टम हाऊसमध्ये मर्च्युरी कॅबिनेट नसल्यामुळे मृतदेह सुरक्षित राहू शकत नाही. दुर्गंधीची समस्यासुद्धा निर्माण होते.