अतिक्रमणे व रहदारीची समस्या सोडविण्याची संधी सोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:27 AM2021-02-07T04:27:46+5:302021-02-07T04:27:46+5:30
नवेगावबांध : सार्वजनिक बांधकाम विभाग अर्जुनी मोरगावच्या दिशानिर्देशात सुरू असलेले शिवालया कंपनीद्वारे केले जाणारे राज्यमार्ग ३६२ हे सानगडी- ...
नवेगावबांध : सार्वजनिक बांधकाम विभाग अर्जुनी मोरगावच्या दिशानिर्देशात सुरू असलेले शिवालया कंपनीद्वारे केले जाणारे राज्यमार्ग ३६२ हे सानगडी- नवेगावबांध व राज्यमार्ग ११ कोहमारा -वडसा रोड मार्गाचे बांधकाम नवेगावबांध येथे सुरू आहे. या बांधकामात नवेगावबांध रेल्वे फाटकापासून ते नवेगाव राष्ट्रीय उद्यानाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील बसस्थानकावर वनविभागाची भिंत व पाटबंधारे विभागाची भिंत आहे. या दोन्ही भिंतीच्या दरम्यान दोन्ही विभागांकडून नाली बनविण्याची विनंती करण्यात आली व सार्वजनिक बांधकाम विभागालाही ग्रामपंचायतीने पत्र देऊन तशी विनंती केली होती. परंतु या दोन्ही विभागाकडे व ग्रामपंचायतीच्या पत्राकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वनविभागाच्या क्वार्टर समोरील वाल कंपाऊंडला लागून असलेल्या रोडचे बांधकाम करण्याची विनंती केली होती. तसेच जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनीसुद्धा वॉल कंपाऊंडपासून बांधकाम करण्याची विनंती केली होती. बसस्थानकावर वाढणारी गर्दी पाहता त्या ठिकाणी जवळपास १५ मीटर रुंदीचे बांधकाम होणे अपेक्षित होते. परंतु, शिवालया कंपनीने हे बांधकाम करतेवेळी व पाटबंधारे विभाग कार्यालय वनविभाग कार्यालय वन विभागाची वसाहत या बाजूने हे बांधकाम करताना कुठल्याही प्रकारची दक्षता घेतली नाही तसेच त्या विभागांच्या सूचनांकडे कंपनीने दुर्लक्ष केल्यामुळे अतिक्रमण व रहदारीची समस्या मात्र कायमच राहील. पुन्हा एकदा अतिक्रमण करणाऱ्यांना संधी मिळेल असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. नवेगावबांध व त्याच्या सभोवताली उंच नाल्या बांधल्याने व वरवरची उंची वाढल्याने एखाद्यावेळी अतिपाऊस झाल्यास चारी बाजूला पाणी साचून शेती व घरांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
.....
सार्वजनिक बांधकाम विभागाने बजावली होती नोटीस
सार्वजनिक बांधकाम विभाग अर्जुनी मोरगाव पीडब्ल्यूडी यांनी काही दिवसांपूर्वी नवेगावबांध बसस्थानक ते टी पाॅईंट परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या दुकानांना नोटिसा बजावल्या होत्या व अतिक्रमण काढून ते रोडपासून लांब करण्याची विनंती केली होती. ३६२ सानगडी-नवेगावबांध किशोरी राज्यमार्ग या रोडचे बांधकाम व राज्यमार्ग ११ कोहमारा -नवेगावबांध-अर्जुनीमोर या रोडचे बांधकाम करताना विभागाला चांगली संधी होती. परंतु, विभागाकडे ग्रामपंचायतीने पत्र पाठविले तसेच काही लोकांनी त्या ठिकाणी हे बांधकाम व्यवस्थित करण्याची विनंती केली. परंतु, दोन्ही विभागाने व कंपनीने या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने रस्त्यावरील अतिक्रमणे व रहदारीची समस्या या पुढेही कायम राहील.