प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी रानभाज्या ठरतात उपयुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:30 AM2021-08-15T04:30:08+5:302021-08-15T04:30:08+5:30
- संतोष पारधी : आमगाव : निसर्गात उपलब्ध रानभाज्या व फळांचे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व आहे. जंगलात तसेच शेतशिवारात नैसर्गिकरीत्या ...
- संतोष पारधी :
आमगाव : निसर्गात उपलब्ध रानभाज्या व फळांचे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व आहे. जंगलात तसेच शेतशिवारात नैसर्गिकरीत्या उगवल्या जाणाऱ्या रानभाज्या व रानफळं आरोग्यासाठी फायदेशीर असून, प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी रानभाज्या उपयुक्त ठरतात, असे प्रतिपादन कृषिभूषण पुरस्कारप्राप्त शेतकरी संतोष पारधी यांनी केले.
तालुका कृषी विभाग व आत्माच्या वतीने शनिवारी (दि. १४) कृषी विभागाच्या कार्यालयासमोर आयोजित रानभाजी महोत्सवात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. उद्घाटन पंचायत समितीच्या माजी सदस्य व तालुका शेतकरी सल्लागार समिती सदस्य छबू उके यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष ईसुलाल भालेकर, एस. एस. भगत, आशा दखने, तालुका कृषी अधिकारी सूरज जाधव, मंडल कृषी अधिकारी पी. पी. मुंढे मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या छायाचित्राला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. याप्रसंगी उके यांनी, कोरोनाशी लढण्यासाठी चांगली प्रतिकारशक्ती पाहिजे. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी रानभाज्या उपयुक्त असून, त्यांचा आहारात समावेश केल्याने आरोग्यसंपन्न राहता येईल, असे मत व्यक्त केले. जाधव यांनी, रानभाज्यांची विक्री व्यवस्था वाढवून त्या विक्रीतून शेतकऱ्यांनाही आर्थिक फायदा मिळण्याकरिता प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन आत्माच्या एस. के. शिवणकर यांनी केले. प्रास्ताविक आर. पी. सेंगर यांनी केले. यावेळी कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक व तालुक्यातील प्रगतिशील शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते.
-------------------------
२०पेक्षा अधिक राजभाज्या व वनस्पतींचे प्रदर्शन
महोत्सवात काटवल, कुडवा, पाथरी, घोळ, अंबाडी, शेवगा, कुर्डू, गुळवेल, आवळा, तरोटा, गवती चहा, रानओवा, सुरण, पातूर, मोहफूल, करवंद, उंदिरकना, मटारू, अळू, बांबूवास्टे आदींसह इतर विविध २० पेक्षा अधिक रानभाज्या व वनस्पतींचे प्रदर्शन तसेच विक्री तालुक्यातील आदिवासी व शेतकरीबांधवांकडून करण्यात आली. तसेच उपस्थितांना रानभाज्या व त्यांच्या औषधीयुक्त गुणधर्मांची माहिती देण्यात आली.