प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी रानभाज्या उपयुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:34 AM2021-08-17T04:34:41+5:302021-08-17T04:34:41+5:30
गोंदिया : रोजच्या सकस आहारात मानवाची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी रानभाज्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी रानभाज्या उपयुक्त असून, आहारात समावेश ...
गोंदिया : रोजच्या सकस आहारात मानवाची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी रानभाज्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी रानभाज्या उपयुक्त असून, आहारात समावेश केल्याने
आरोग्य संपन्न राहता येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री नवाब मलिक यांनी केले.
तालुका कृषी अधिकारी कार्यालय व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्तच्या वतीने नवीन
प्रशासकीय इमारत येथे रविवारी (दि.१५) आयोजित जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार विनोद अग्रवाल, जिल्हाधिकारी नयना गुंडे, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गणेश घोरपडे प्रामुख्याने उपस्थित होते. पुढे बोलताना मलिक यांनी, रानभाज्यांमध्ये पोषक तत्व असल्यामुळे त्यांचे आहारशास्त्रीय महत्त्व आहे. रानभाज्यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. बचतगटामार्फत उत्पादन वाढीसाठी कृषी विभागाने विशेष लक्ष देण्याची गरज आहे. रानभाजी महोत्सवातून शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होणार आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून परंपरागत उगवणाऱ्या रानभाज्यांची शहर व ग्रामीण भागातील लोकांना माहिती व्हावी हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे. रानभाज्यांमुळे शेतकऱ्यांना उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण झाले आहे. त्यामुळे रानभाज्यांची उत्पादन क्षमता वाढविणे गरजेचे आहे, असे सांगितले.
प्रास्ताविकातून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी घोरपडे यांनी जिल्ह्यात ९ ते १५ ऑगस्ट या कालावधीत सर्वच तालुक्यांमध्ये रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले. कार्यक्रमास तहसीलदार आदेश डफळ, अप्पर तहसीलदार अनिल खडतकर, कृषी उपसंचालक प्रणाली चव्हाण,
उपविभागीय कृषी अधिकारी भीमाशंकर पाटील, देवरी उपविभागीय कृषी अधिकारी मंगेश वावधने, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सतीश मार्कंड, तंत्र अधिकारी कावेरी साळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सुनील खडसे व सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक शैलेश बिसेन यांनी केले. संचालन तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम यांनी केले. आभार उपविभागीय कृषी अधिकारी भीमाशंकर पाटील यांनी मानले.
---------------------------------
रानभाज्यांच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन
यावेळी रानभाज्यांच्या माहिती पुस्तिकेचे पालकमंत्री मलिक यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच ज्या शेतकरी व महिला बचतगटांनी रानभाजी महोत्सवात सहभाग घेतला त्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवात कृषी विभागामार्फत शेतकरी, उमेद व महिला आर्थिक विकास महामंडळांचे रानभाज्या विक्रीचे एकूण ६५ स्टॉल लावण्यात आले होते. यामध्ये केना भाजी, आघाडा,
बारमाही लसून, कोचईचे पाने, बरमाराक्षसची पाने, सेवगा, सिल्लारी भाजी, आंबाडी भाजी, तरोटा भाजी, पातूर भाजी, खापरखुटीची भाजी, उंदीरकानाची भाजी, हरदफरीची भाजी, कुंदरु, भूईआवळा, पदीना, कुड्याचे फुल व
कुड्याच्या शेंगा, केवकांदा, काटवल, करवंद, मटारू, कारले, घुया, सुरण, भूईलिंब, पानफुटी, गुळवेल, तेलपांढरा, मशुरुम, भोंबोडी व इतर रानभाज्यांची विक्री करण्यात आली. महिला बचत गटामार्फत रानभाज्यापासून बनविलेल्या खाद्यपदार्थांचे स्टॉलही लावण्यात आले होते.