अन् तो बिबट चक्क घरातच शिरला; शेळीवर मारला ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2022 09:09 PM2022-05-23T21:09:43+5:302022-05-23T21:10:14+5:30
Gondia News जंगलातून शेतशिवारामार्गे गावात शिरलेल्या बिबट्याने चक्क एका घरात ठाण मांडले. ही घटना गोंदिया जिल्ह्यातील बोंडगावदेवी येथे घडली.
अमरचंद ठवरे
गोंदिया : गावात बिबट आला रे आला... अशी वार्ता हव्यासारखी पसरली. शेतशिवारात जवळील घराशेजारील आंब्याच्या झाडावर सायंकाळी बस्तान मांडल्याचे काही गावकऱ्यांना आढळले. बिबट्याने गावात ठाण मांडल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. बिबट झाडावर बसून असल्याची वार्ता गावात पसरताच बघ्यांची गर्दी झाली. त्या बिबट्याने आव-डाव पाहून चक्क जवळच्या घरामध्ये चक्क आसरा घेतला. ही घटना सोमवारी (दि.२३) सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास बोंडगावदेवी येथे घडली.
प्राप्त माहितीनुसार बोंडगावदेवी येथील वाॅर्ड क्रमांक ४ मधील रहिवासी सरपंच प्रतिमा बोरकर यांनी आपल्या घराच्या बाजूने बिबट येताना पाहिले. त्यानंतर झालेल्या लोकांच्या जमावामुळे त्या बिबट्यांनी कुंडलिक बोरकर यांच्या घराजवळील आंब्याच्या झाडावर ठाण मांडले. आंब्याच्या झाडावर वाघ बसला रे असा गदारोळ गावकऱ्यांनी केला. लोकांच्या गदारोळात त्या बिबटयाने जवळच्या नामदेव बोरकर यांच्या घरात प्रवेश करुन तिथेच ठाण मांडले. सुदैवाने घरामध्ये कोणतीही व्यक्ती नसल्याने अनर्थ टळला.
बिबटयाने घरात दडी मारून चुप्पी साधल्याने घराशेजारी राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घरात बिबट शिरल्याची माहिती गावकऱ्यांकडून वनविभागाचे क्षेत्र सहाय्यक वासुदेव वेलतुरे, वनरक्षक राऊत, दिलीप मुनेश्वर मिळताच ते घटनास्थळी आले. त्यांनी रेस्कू टिमला कळविले. काही वेळातच ही टीम गावात पोहोचली. लोकांचा जमाव असल्याने शांततेसाठी पोलीस स्टेशन अर्जुनी-मोरगाव येथून पोलीस कुमक बोलविण्यात आले. बिबट्याला पाहण्यासाठी गावकऱ्यांनी बोरकर यांच्या घरी रिघ लावली होती. चक्क दिवसा बिबटयाने गावात येवून राहत्या घरात ठाण मांडल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. घरातून त्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे प्रयत्न सुरु आहेत. वृत्त लिहेपर्यंत त्या बिबटयाला पकडण्यात आले नव्हते.
रविवारी बकरीवर मारला ताव
या बिबटयाने रविवार (दि.२२) याच परिसरातील यादोराव बोरकर यांच्या गोठयातील बकरीची रात्री १ वाजताच्या सुमारास शिकार केली. त्या बकरीचा नरडीचा घोट घेतल्यानंतर सोमवारी त्याच परिसरातील कुंडिलक बोरकर यांच्या घराशेजारील आंब्याच्या झाडावर बस्तान मांडून दिवसभर तिथेच बिबट असावा असा कयास बांधला जात आहे. सायंकाळी घराशेजारील लोकांना त्या बिबटयाचे दर्शन होताच गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.