विहिरीत पडलेल्या बिबट्याला साडेपाच तासानंतर मिळाले जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2023 06:45 PM2023-03-07T18:45:09+5:302023-03-07T18:46:02+5:30
लाखांदूर वन विभागाची महत्त्वपूर्ण कामगिरी
दयाल भोवते, लाखांदूर : रात्रिच्या सुमारास शिकारीच्या शोधात जंगलातुन शेत शिवारात भरकटकलेला बिबट एका शेतातील विहिरित पडल्याची घटना ७ मार्च रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास उघडकीस आली होती. लखांदूर वनविभाग व गोंदिया वन विभागाच्या वन्यजीव बचाव पथकाने अथक परिश्रम करून बिबट्याला विहिरीतून सुखरूप बाहेर काढले.
हा बिबट अंदाजे दीड वर्षे वयाचा होता. सरांडी (बू) येथील रमेश गणपत राऊत नामक शेतकऱ्याच्या शेतातील विहिरीत पडल्याची माहिती मिळतात वनविभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बिबट जिवंत असल्याची खात्री होताच वन परिक्षेत्र अधिकारी रुपेश गावित यांनी घटनेची माहिती साकोलीचे सहायक वन संरक्षक रोशन राठोड यांना देत वन्य जीव बचाव पथकाची मागणी केली. गोंदिया वन विभागाच्या वन्य जीव बचाव पथकाच्या चमूने घटनास्थळी दाखल होवून पिंजऱ्याच्या सहाय्याने जवळपास ६० फुट खोल विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढून जीवनदान दिले. बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. अनुचित घटना घडू नये म्हणून विभागाने चोख बंदोबस्त राखला होता.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"