कमी मनुष्यबळात उत्पादनवाढ

By admin | Published: April 3, 2017 01:38 AM2017-04-03T01:38:56+5:302017-04-03T01:38:56+5:30

दिवसेंदिवस शेतीच्या मशागत कामासाठी मनुष्यबळाचा अभाव जाणवत आहे. परंपरागत पद्धतीने धानाची लागवड होत

Less growth in human consumption | कमी मनुष्यबळात उत्पादनवाढ

कमी मनुष्यबळात उत्पादनवाढ

Next

धनराज तुमडाम : अनुदानावर धानरोवणी यंत्रांचे वाटप
बोंडगावदेवी : दिवसेंदिवस शेतीच्या मशागत कामासाठी मनुष्यबळाचा अभाव जाणवत आहे. परंपरागत पद्धतीने धानाची लागवड होत असल्याने लागवड खर्चामध्ये वाढ होत आहे. मशागत खर्चाच्या तुलनेत पाहिजे त्या प्रमाणात उत्पादनात वाढ होत नाही. धान पिकाचे उत्पादन घेण्यासाठी पारंपरिक पद्धतीला फाटा देत शेतकऱ्यांनी यांत्रिकीकरणाची कास धरावी. धानरोवणी यंत्रामुळे धानाच्या उत्पादनात निश्चितपणे वाढ होईल, असे मत तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम यांनी व्यक्त केले.
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील महिला-पुरुष शेतकरी बचत गटांना अनुदान तत्वावर धान रोवणी यंत्र वाटप कार्यक्रमात ते मार्गदर्शन करीत होते.
अध्यक्षस्थानी तालुका कृषी अधिकारी डी.एल. तुमडाम होते. याप्रसंगी मार्गदर्शक म्हणून मंडळ कृषी अधिकारी नंदकुमार मुनेश्वर, कृषी पर्यवेक्षक ऋषी चांदेवार, पी.बी. ठाकूर व तालुक्यातील प्रगतीशील शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते.
शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना तुमडाम पुढे म्हणाले, गाव पातळीवरचा शेतकरी हा जगाचा अन्नदाता आहे. शेतकऱ्यांच्या शेतशिवारात यंत्र पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. पीक उत्पादन खर्चाला कात्री लावण्यासाठी पारंपरिक पद्धतीला फाटा देवून यांत्रिकीकरणाची कास धरणे गरजेचे असल्याचे सांगून ते म्हणाले, धानाचे पीक घेताना आजघडीला मनुष्यबळाची उणीव जाणवते. तसेच धान उत्पादक खर्चात दिवसेंदिवस कमालीची वाढ होत आहे. खर्चिक बाबींवर मात करण्यासाठी धान रोवणी यंत्र विकसित करण्यात आले आहे. सदर यंत्रामुळे मनुष्य बळाची गरज भासत नाही. धान रोवणीचा खर्च एकरी पाचशे रुपये येतो. मॅन नर्सरीने रोपाची लागवड करुन यंत्राणे धानाची रोवणी केल्यास बियाणांची बचत होते. धान रोवणी यंत्राणे धानाची लागवड ओळीने केली जाते.
श्री पद्धतीने रोवणी होत असल्याने धान पिकांमध्ये पोषक वातावरण निर्मिती होऊन सूर्यप्रकाश व मुबलक प्रमाणात विविध अन्नद्रव्ये धानाच्या रोपांना मिळून पिकांची चांगली वाढ होते. शास्त्रीय पद्धतीने लागवड झालेल्या रोपांची चांगली वाढ होते व उत्पादनात वाढ होत असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी वेळेत धानाची रोवणी झाल्याने पिकाची वाढ होवून भरघोष उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी धान रोवणी यंत्राचा वापर करावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी तुमडाम यांनी केले. मानव विकास कार्यक्रम अंतर्गत धान रोवणी यंत्राचे तालुक्याला २५ चे उद्दिष्ट देण्यात आले होते.
सदर यंत्र बाजार भावानुसार दोन लाख २० हजार रूपयांचे असले तरी लाभार्थी शेतकरी गटाला अनुदानावर ५४ हजार ९८७ रुपये भरुन पुरवठा केला जातो. तालुक्यातील २२ महिला व पुरुष शेतकरी बचत गटांनी प्रस्ताव सादर केले होते. ते सर्व मंजूर करण्यात आले.
संचालन मंडळ कृषी अधिकारी मुनेश्वर यांनी केले. प्रास्ताविक कृषी सहाय्यक चांदेवार यांनी मांडले. आभार कृषी पर्यवेक्षक पी.बी. ठाकूर यांनी मानले. कार्यक्रमाला बचत गटाचे पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)

 

Web Title: Less growth in human consumption

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.