कृषी संजीवनीकडे शेतकऱ्यांची पाठ
By Admin | Published: September 13, 2014 01:58 AM2014-09-13T01:58:33+5:302014-09-13T01:58:33+5:30
थकीत बाकी असलेल्या वीज बिलांवर ५० टक्के माफी देणाऱ्या कृषी संजीवनी योजनेने राज्यभरात धूम माजविली आहे.
कपिल केकत गोंदिया
थकीत बाकी असलेल्या वीज बिलांवर ५० टक्के माफी देणाऱ्या कृषी संजीवनी योजनेने राज्यभरात धूम माजविली आहे. जिल्ह्यात १२ हजार २५६ थकबाकीदार शेतक ऱ्यांच्या कृषी पंपांना ही योजना संजीवनी देणारी ठरणार आहे. मात्र जिल्ह्यात या योजनेला जिल्ह्यात पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांकडे थकून असलेल्या पाच कोटी २५ लाख ५२ हजार रूपयांपैकी अद्याप एक कोटी २० लाख ४८ हजार रूपयेच महावितरणला प्राप्त झाले आहेत.
नियमीत वीज बिल भरणाऱ्या शेतकऱ्यांचा यात समावेश आहे. येत्या ३१ आॅक्टोबरनंतरच किती थकबाकीदार शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला हे स्पष्ट होणार आहे.
कधी अतिवृष्टी तर कधी गारपिटीने झोडपून काढलेल्या शेतकऱ्यांना आधार देता यावा म्हणून राज्य शासनाने महावितरणला सोबत घेत कृषी संजीवनी योजना राज्यात सुरू केली आहे. १ आॅगस्ट २०१४ पासून राबविल्या जात असलेल्या या योजनेंतर्गत कृषी पंपधारकांना थकलेल्या वीज बिलावर ५० टक्के माफीसोबतच थकीत वीज बिलावरील व्याज व दंड पूर्णपणे माफ केले जाणार आहे. यासाठी अशा अनियमीत कृषी पंपधारक शेतकऱ्यांना त्यांच्याकडील थकीत रक्कम येत्या ३१ आॅक्टोबरपर्यंत एकरकमी किंवा तीन मासिक हप्तात भरावयाची आहे.
जिल्ह्यात २१ हजार ३३१ कृषी पंपधारक असून यातील अनियमीत वीज बिल भरणा करणारे १२ हजार २५६ पंपधारक आहेत. यावरून या १२ हजार २५६ पंपधारकांसाठीच ही योजना संजीवनी बनून आल्याचे दिसून येते.
कारण या योजनेच्या मुदतीत त्यांनी त्यांच्याकडील थकीत रक्कम न भरल्यास विद्युत कायदा २००३ नुसार वसुलीकरिता त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. मात्र असे असतानाही एवढ्या फायदेशीर योजनेला जिल्ह्यात अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यातील कृषी पंप धारकांवर महावितरणचे पाच कोटी २५ लाख ५२ हजार रूपये थकीत आहेत. शिवाय ९४ लाख ७८ हजार रूपयांचे व्याज व १० लाख ५१ हजार रूपये दंडाची रक्कम आहे. मात्र महावितरणच्या ३१ आॅगस्टपर्यंतच्या आकडेवारीनुसार, कृषी पंपधारकांकडून एक कोटी २० लाख ४८ हजार रूपये प्राप्त झाले असल्याचे महावितरणचे लेखाधिकारी वाघ यांनी सांगितले.