समाज मंदिरात विद्यार्थ्यांना धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 09:48 PM2018-09-24T21:48:27+5:302018-09-24T21:48:44+5:30
ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी शिक्षणाचा कायदा लागू करण्यात आला. शिक्षणासाठी सुसज्ज इमारतीसह आवश्यक शैक्षणिक साहित्य पुरविण्याची जबाबदारी शिक्षण विभाग व संबंधित यंत्रणेची आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी शिक्षणाचा कायदा लागू करण्यात आला. शिक्षणासाठी सुसज्ज इमारतीसह आवश्यक शैक्षणिक साहित्य पुरविण्याची जबाबदारी शिक्षण विभाग व संबंधित यंत्रणेची आहे. मात्र अर्जुनी-मोरगाव तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या ग्राम घुसोबाटोला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील २५ विद्यार्थी वर्ग खोल्यांना गळती लागल्याने चक्क समाज मंदिरात बसून धडे घेत असल्याचे चित्र आहे.
बोंडगावदेवी जिल्हा परिषद क्षेत्रातंर्गत येणाऱ्या ग्राम घुसोबाटोला येथे वर्ग १ ते ४ पर्यंत शिक्षणाची सोय आहे. सद्यस्थितीत १४ मुली व ११ मुले असे २५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. येथे कार्यरत असलेले शिक्षक आजारामुळे रजेवर असून मुख्याध्यापिका म्हणून मंजुषा कावळे व प्रतिनियुक्तीवर असलेल्या संध्या भाजिपाले या दोन शिक्षिका जबाबदारी सांभाळीत आहेत. शाळेची इमारत फार जुनी आहे. तर वर्ग खोल्या जीर्णावस्थेत आहे.
वर्ग खोल्यांचे स्लॅब ठिकठिकाणी गळत आहे. तर काही ठिकाणी मोठ्या भेगा पडल्या आहेत.
थोडाही पाऊस आला तरी सर्व वर्ग खोल्या गळतात. जिथे विद्यार्थी बसतात त्याच ठिकाणी पाणी गळते. वर्ग खोलीमध्ये विद्युत पुरवठा केला असल्याने, साधरण पावसाच्या सरीने भिंतींना करंट येत असल्याचे शिक्षिकांनी सांगितले. पाणी गळत असल्याने शाळेचे कार्यालयीन साहित्य, संगणक व इतर साहित्य जिथे मुले बसतात त्या ठिकाणी ठेवण्यात आले आहे.
पावसाळ्यात वर्ग खोल्या गळत असल्याची माहिती जिल्हा परिषद शिक्षण विभागाला दिली. मात्र अद्यापही कुठल्याच उपाय योजना करण्यात आल्या नाही. अशात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून त्यांना समाज मंदिरात बसवून शिकविले जात आहे.