त्या नराधमांना फाशीच द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 10:07 PM2018-04-16T22:07:47+5:302018-04-16T22:07:47+5:30
कठुआ व उन्नाव येथील घटनेच्या पाठोपाठ गुजरात राज्यातील सुरतमध्येही चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणांतील नराधमांना केवळ फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी येथील सर्व सामाजिक संघटनेने केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कठुआ व उन्नाव येथील घटनेच्या पाठोपाठ गुजरात राज्यातील सुरतमध्येही चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणांतील नराधमांना केवळ फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी येथील सर्व सामाजिक संघटनेने केली. संघटनेच्यावतीने सोमवारी (दि.१६) कॅन्डल मार्च काढून चिमुकल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
कठुआ व उन्नाव येथील घटनांनी देशात संतापाचे वातावरण निर्माण झाले असतानाच सुरतमध्येही चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचे प्रकरण समोर आले आहे. असे असतानाही सरकारने मौन धारण केले असून अद्याप कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे हे कृत्य करणारे नराधम मोकाट फिरत आहेत. देशात अशा प्रकारच्या घटना यापुढे घडू नये यासाठी सरकारने अत्याचारांच्या प्रकरणांत कठोर कायदा तयार करून दोषींना फक्त फाशीच द्यावी. अशी मागणी येथील सर्व सामाजीक संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.
आपल्या मागणीसाठी व अत्याचारांच्या प्रकरणांत आपला जीव गमावलेल्या चिमुकल्यांना श्रद्धांजली देण्यासाठी संघटनेच्यावतीने सोमवारी (दि.१६) सायंकाळी ७ वाजता शहरात कॅन्डल मार्च काढण्यात आला. मामा चौकातून निघालेला कँडल मार्च शहरातील बाजार भागातून होत आंबेडकर चौकात पोहचल्यानंतर तेथे चिमुकल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच संघटनेच्या वतीने तहसीलदारांमार्फत राष्ट्रपती व प्रधानमंत्र्यांच्या नावाने निवेदन पाठविण्यात आले. या निवेदनातून नराधमांना फाशीची मागणी केली.
या कँडल मार्चमध्ये संघटनेचे अध्यक्ष सय्यद रजाउद्दीन, उपाध्यक्ष सुनील तिवारी, सचिव इमरान खान, सहसचिव विनोद पंधरे, कोषाध्यक्ष अकरम पठाण, नगर परिषद सभापती शकील मंसूरी, नगर परिषद सदस्य पंकज यादव, लोकेश यादव, गप्पू गुप्ता, अपूर्व अग्रवाल, भावना कदम, सुजाता बहेकार, सिमा बैतुले, लता बाजपेई, धर्मिष्ठा सेंगर यांच्यासह शेकडोंच्या संख्येत महिला- पुरूष सहभागी झाले होते.