वन्यप्राण्यांच्या शिकारीला बसणार आळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 09:36 PM2018-08-26T21:36:19+5:302018-08-26T21:37:10+5:30
गोंदिया-भंडारा जिल्ह्यात नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान व व्याघ्र प्रकल्प, नागझिरा अभयारण्य आहे. त्यामुळे या परिसरात वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. मागील तीन चार महिन्यात वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
कारुसेना सांगोळे।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोठणगाव : गोंदिया-भंडारा जिल्ह्यात नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान व व्याघ्र प्रकल्प, नागझिरा अभयारण्य आहे. त्यामुळे या परिसरात वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. मागील तीन चार महिन्यात वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. परिणामी अनेक दुर्मिळ प्राणी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.या प्रकाराला आळा घालण्यासाठी वन्यजीव विभागाने शिकाऱ्यांची माहिती देणाऱ्यांना रोख बक्षीस देण्याची योजना सुरू केली आहे.
नवेगावबांध व्याघ्र प्रकल्पात वाघ, बिबट, हरिण, सांभर, चितळ, भेडकी यासह अनेक वन्यप्राणी आहेत. मात्र मागील दोन महिन्यांपासून विद्युत करंट लावून वन्यप्राण्याची शिकार केली जात असल्याचे प्रकार उघडकीस आले आहे.
यामुळे काही प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. शिकारी जंगलातून गेलेल्या अति उच्च दाब विद्युत वाहिनीवर आकडा टाकून विद्युत तारांचे जाळे तयार करुन वन्यप्राण्यांची शिकार करतात. त्यामुळे अनेक दुर्मिळ वन्यजीव नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. दरम्यान यासर्व प्रकाराची वन्यजीव विभागाने गांर्भियाने दखल घेतली आहे.
शिकारच्या घटनांना पूर्णपणे पायबंद लावण्यासाठी आता कंबर कसली आहे. वाघ किंवा बिबट्याच्या शिकारीची माहिती दिल्यास १५ हजार रुपयाचे बक्षीस देण्याची घोषणा केली.
सांभर, चितळ, भेडकी किंवा निलगायीच्या शिकारीची किंवा त्याचे मास बाळगणाऱ्या किंवा त्याचा अवैध व्यापार करणाऱ्यांची माहिती दिल्यास ५ हजार रुपयाचे रोख बक्षीस देण्यात येईल.
शेत कुंपणाला विद्युत प्रवाह जोडणाऱ्यांची माहिती दिल्यास १ हजार रुपये रोख, वन्यप्राणी मारण्याच्या उद्देशाने ११००० व्होल्टच्या लाईनवर आकडा टाकून तारा लावणाऱ्यांची माहिती दिल्यास रुपये ५ हजाराचे बक्षीस देण्यात येणार आहे. शिवाय माहिती देणाºयाचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे.
गावागावात जनजागृती
वन्यजीव विभागाने वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या घटनांना पूर्णपणे पायबंद लावण्यासाठी बक्षीस योजना सुरू केली आहे. याची माहिती गावकऱ्यांना देण्यासाठी वन्यजीव विभागाने दवंडीव्दारे जनजागृती केली जात आहे. बक्षीस योजनेची माहिती दिली.