महिलांना योजनांची माहिती द्या

By admin | Published: February 26, 2016 02:03 AM2016-02-26T02:03:26+5:302016-02-26T02:03:26+5:30

महिला आर्थिक विकास महामंडळाने ग्रामीण भागातील महिलांचे संघटन करुन त्यांना बचतीची सवय लावली.

Let the women know about the plans | महिलांना योजनांची माहिती द्या

महिलांना योजनांची माहिती द्या

Next

मिलिंद कंगाली: ४६० गावांत ४ हजार ३७३ बचत गट
गोंदिया : महिला आर्थिक विकास महामंडळाने ग्रामीण भागातील महिलांचे संघटन करुन त्यांना बचतीची सवय लावली. पुढे त्यांच्या स्वावलंबनच्या दृष्टीने त्यांना उद्योग-व्यवसायाकडे वळविले. आर्थिक स्वावलंबनामुळे त्या आता सक्षम होत आहे. महिलांनी आता ग्राम विकासाच्या व लाभार्थ्याना योजनांची माहिती द्यावी, असे मत नाबार्डचे सहायक महाव्यवस्थापक मिलिंद कंगाली यांनी व्यक्त केले.
२४ फेब्रुवारी रोजी गोंदिया येथे महिला आर्थिक विकास महामंडळाच्या स्नेहसंमेलन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून विदर्भ कोकण ग्रामीण विकास बँकेचे जिल्हा समन्वय अधिकारी ट.ीएम. चिंधालोरे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, अदानी फाऊंडेशनचे सुबोध सिंग, आयसीआयसीआय बँकेचे व्यवस्थापक स्वप्नील वडगावकर, सारडा संस्थेचे राज्य समन्वयक एस.आर. केदारी उपस्थित होते.
कंगाली पुढे म्हणाले, बचत गटांना पतपुरवठा करण्यास बॅकांची उदासीनता दिसून आली. बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूच्या गुणवत्तेवर भर द्यावा. बचत गटांनी आता बाजारपेठेची गरज ओळखून उत्पादन तयार करावे. वनस्पतीपासून सौंदर्य प्रसाधने तयार करुन त्याची बाजारपेठेत विक्र ी करावी. असा सल्लाही दिला.
चिंधालोरे म्हणाले, बचत गटाचा हिशेब चोखपणे ठेवावा. हिशेब चोखपणे न ठेवल्यास बचत गटांच्या सदस्यांमध्ये भांडणे निर्माण होतात. त्यामुळे चांगल्या प्रकारे चालत असलेला बचत गट बंद होतो. भांडणाचा विपरीत परीणाम सदस्यांच्या आर्थिक विकासावर होतो. बचत गटातील प्रत्येक म्ािहलेला त्याच्या व्यवहाराची माहिती असली पाहिजे. बचत गटाच्या विविध प्रकारच्या निर्णय प्रक्रियेत प्रत्येक महिलांनी सहभागी असले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे म्हणाले, केवळ चूल आणि मूल या क्षेत्रापुरताच मर्यादित महिला आता राहिलेल्या नाही. आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला काम करतांना दिसत आहे. सावित्रीबाई फुलेचा आदर्श पुढे ठेऊन महिलांची वाटचाल सुरु आहे. महिलांनी आता उद्योग व्यवसायासोबतच समाजाच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय विकासाकडे लक्ष द्यावे. विविध शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवाव्यात. सामाजिक उपक्रम राबवून आरोग्य, शिक्षण व पिण्याचे पाणी सर्वांना मिळेल यासाठी महिलांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.
सुबोधिसंग म्हणाले, महिलांमध्ये आत्मविश्वास आहे. हाच आत्मविश्वास त्यांना सन्मानाकडे घेऊन जातो. आर्थिक स्वावलंबनासाठी बचत गट हे महिलांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. महिला बचतगटांनी शिस्तीने काम करावे. बचतगटांनी काही प्रस्ताव अदानी फाऊंडेशनला दिले तर निश्चित मदत करण्यात येईल. बचत गटांनी रोपटयांची नर्सरी तयार केली तर रोपटयांची खरेदी अदानी फाऊंडेशन करेल असे सांगून बचत गटांनी अनुदानावर आता अवलंबून राहू नये स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन केले.
प्रास्ताविकातून माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे म्हणाले, महिलांना सक्षम करण्याचे काम माविम करीत आहे. महिलांची क्षमता बांधणी करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सात तालुक्यात ४६० गावांमध्ये ४ हजार ३७३ स्वयंसहायत बचत गट असून ५३ हजार २४२ महिला बचत गटांच्या सदस्य आहेत. दर महिन्याला सदर महिला ३७ लाख २६ हजार रुपयांची बचत गटामध्ये बचत करीत आहे. तिरोडा व सालेकसा तालुक्यातील २०० गावांमध्ये माविम महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान राबवीत आहे. बचत गटातील महिला वेगवेगळे उपक्रम राबवून सामाजिक कार्यात सहभाग घेत आहे, असे सांगितले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी पाहुण्यांनी माविमच्या सहयोगिनी व व्यवस्थापक यांनी बचत गटांच्या लिहिलेल्या यशोगाथा प्रदर्शनाचे अवलोकन केले. स्नेहसंमेलन कार्यक्रमाला जिल्ह्यातील माविमच्या लोकसंचालित साधन केंद्राचे व्यवस्थापक, कर्मचारी व सहकाऱ्यांची उपस्थिती होती.
यावेळी आशा दखने, हेमलता वासनिक, माया कटरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. संचालन सहायक नियंत्रण अधिकारी प्रदीप कुकडकर यांनी तर आभार सहायक जिल्हा समन्वय अधिकारी सतीश मार्कंड यांनी मानले. यशस्वीतेसाठी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Let the women know about the plans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.