काम होऊ दे, नववर्ष सुखाचे जाऊ दे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 12:24 AM2019-01-02T00:24:57+5:302019-01-02T00:26:03+5:30
सन २०१८ संपले असून २०१९ या नववर्षातील पहिला दिवस उजाडला. मागील वर्षात झाले ते झाले, मात्र हे वर्ष सुख व समाधानाचे जावे याकरिता देवाला साकडे घालण्यासाठी नववर्षाच्या पहिल्या दिवशी मंगळवारी (दि.१) नागरिकांची आपापल्या धार्मिक स्थळांवर गर्दी केली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सन २०१८ संपले असून २०१९ या नववर्षातील पहिला दिवस उजाडला. मागील वर्षात झाले ते झाले, मात्र हे वर्ष सुख व समाधानाचे जावे याकरिता देवाला साकडे घालण्यासाठी नववर्षाच्या पहिल्या दिवशी मंगळवारी (दि.१) नागरिकांची आपापल्या धार्मिक स्थळांवर गर्दी केली होती.
मागील वर्षात काही चांगले तर काही वाईट अनुभव आले. मुख्य म्हणजे देशातील आतंकवादी हल्ले, गुन्हेगारी, खून, अत्याचार यासारख्या घटनांनी मागील वर्ष गाजले व कलंकितही झाले. सोबतच दिवसेंदिवस वाढत असलेल्या महागाईमुळे वाढलेला त्रास ही सर्व देशावरची संकटे आहेत. तर दुसरीकडे अपघात व गुन्हेगारी घटनांनीही जिल्हा गाजला. एकंदर मागील वर्षात रोज काही ना काही ऐकायला आले. मात्र २०१९ या नववर्षात असे काही अभद्र ऐकायला येऊ नये. मागील वर्षी झाले ते झाले, चुकांना पदरात पाडून व हे वर्ष कुशल, मंगल झाले पाहीजे अशीच सर्वांची मनोकामना आहे. आपली ही मागणी देवापुढे मांडण्यासाठी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मंगळवारी (दि.१) नागरिकांनी मंदिर, मस्जीद, गुरूद्वारे व चर्चमध्ये जाऊन आपापल्या प्रार्थना पद्धतीनुसार देवाला साकडे घातले.
हनुमान व साई मंदिरात एकच गर्दी
शहरातील सिव्हील लाईन्स परिसरातील हनुमान मंदिर व मामा चौक परिसरातील साई मंदिराची सर्वदूर ख्याती आहे. जागृत मंदिर म्हणून हे मंदिर ओळखले जात असून नेहमीच या मंदिरात गर्दी असते व दूरवरून लोकं येथे हनुमंताच्या दर्शनासाठी येतात.नववर्षाचा पहिला दिवस असल्याने पूर्ण वर्ष सुख व समाधानाचे जावे हे साकडे हनुमंताला घालण्यासाठी मंगळवारी नागरिकांनी एकच गर्दी केली. सकाळच्या आरतीपासूनच मंदिरात भाविकांची गर्दी दिसून येत होती. हनुमंताच्या दर्शनासाठी मंदिरात भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.
नवीन वर्षांचे सेलीब्रेशन धार्मिक स्थळांवर
२०१८ ला बाय-बाय करण्यासाठी थर्टीफस्ट सेलीब्रेशन पार्टी करून साजरा करण्यात आले. मात्र नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी नागरिकांचा कल धार्मिक स्थळांकडे दिसला. नवीन वर्षात सुख, समृद्धी व समाधान लाभावे यासाठी देवाला साकडे घालून त्यांचा आर्शिवाद घेतल जातो. त्यानुसार मंगळवारी सकाळपासून अगोदर घरातील थोरामोठ्यांचे चरणस्पर्श करून व त्यानंतर आपापल्या धर्मस्थळांवर जाऊन नागरिकांनी आपल्या इष्ट देवाचा आर्शिवाद घेण्यास पसंती दर्शविली. यामुळेच हॉटेल्समध्ये गर्दी असतानाच धार्मिक स्थळांवरही नागरिकांची गर्दी बघावयास मिळाली.