कोरोनाला हरवू या जिल्ह्याला आत्मनिर्भर बनवू या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:26 AM2021-02-20T05:26:08+5:302021-02-20T05:26:08+5:30
केशोरी : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने अंमलबजावणीचे आदेश निर्गमित केले आहेत. अशात छत्रपती शिवाजी ...
केशोरी : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने अंमलबजावणीचे आदेश निर्गमित केले आहेत. अशात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून येथील ठाणेदार संदीप इंगळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक बाबू मुंढे यांनी पोलीस पथक तयार करून गावच्या मुख्य रस्त्यावर बंदोबस्त लावून कोरोनाला हरवू या, जिल्ह्याला आत्मनिर्भर बनवू या, या संकल्पनेला धरून जनजागरण मोहीम नुकतीच हाती घेतली आहे. यामुळे प्रत्येक वाहन चालक मास्क लावून व सीटबेल्ट लावून गाडी चालविताना दिसून येत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी परिपत्रक काढून कोरोना विषाणूचा प्रादर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. त्यानुसार येथील पोलीस ठाण्याच्या वतीने ठाणेदार संदीप इंगळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक बाबू मुंडे यांनी एक पथक तयार करून गडचिरोली व चंद्रपूर या जिल्ह्यांना जोडणाऱ्या येथील प्रमुख रस्त्यावर बंदोबस्त लावला आहे. तसेच जनजागरण मोहिमेतून कोरोनाची लस सामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी किती कालावधी लागणार, हे काही निश्चित नसल्याने स्वत: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मास्क लावणे, फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे, सीटबेल्ट लावणे, हेलमेट वापरणे, विना परवाना गाडी चालविणे इत्यादी नियम पाळावे, असे सांगितले जात आहे. तसेच जोपर्यंत लस नाही तोपर्यंत कोरोनाचे नियम पाळून आपल्याला सुरक्षित ठेवण्याचा सल्ला देऊन कोरोनाला दूर ठेवण्याच्या संकल्पनेतून जनजागरण केले जात आहे. या मोहिमेला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून या मोहिमेतून प्रत्येक वाहन चालकास चांगला संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे.