कनेरीचा सर्वांगीण विकास करू
By admin | Published: February 24, 2016 01:41 AM2016-02-24T01:41:21+5:302016-02-24T01:41:21+5:30
कनेरीच्या सर्वांगीण विकासासाठी यंत्रणांनी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी.
पालकमंत्री बडोले : अंमलबजावणीच्या कार्यात ग्रामस्थांना सहभागी करा
गोंदिया : कनेरीच्या सर्वांगीण विकासासाठी यंत्रणांनी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. त्यासोबतच ग्रामस्थांना अंमलबजावणीच्या कार्यात सहभागी करून घ्यावे, असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.
सडक-अर्जुनी तालुक्यातील कनेरी-राम या गावाची निवड पालकमंत्री बडोले यांनी आमदार आदर्श गाव योजनेंतर्गत केली आहे. गावाच्या सर्वांगिन विकासाच्या दृष्टीने कनेरी-राम येथे नुकतीच पालकमंत्री बडोले यांनी विविध यंत्रणांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची आढावा सभा घेतली. याप्रसंगी ते बोलत होते.
सभेला जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, जिल्हा परिषद सदस्य माधुरी पाथोडे, पंचायत समती उपसभापती विलास शिवणकर, पं.स. सदस्य लीलाधर हत्तीमारे, सरपंच इंदिरा मेंढे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत मोठ्या प्रमाणात गावाचा कायापालट करण्याची क्षमता आहे. यंत्रणांनी सहयोगातून विविध विकासकामे करण्यासाठी ग्रामस्थांना विश्वासात घेऊन काम करावे. विविध योजनांच्या अंमलबजावणीचा लाभ गरजू लाभार्थ्यांना द्यावा. शाळेत आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. कोणताही बालक शालेय शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी. गावातील सर्व कुटूंब शौचालयाचा नियमित वापर करतील यासाठी ग्रामस्थांना शौचालयाचे महत्व पटवून द्यावे. ई- लर्निंगचा उपक्र म शाळेत सुरु करावा.
गावातील कोणीही निरक्षर राहणार नाही, यासाठी निरक्षरांचे साक्षरता वर्ग, शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी पांदन रस्ते तयार करावे असे सांगून पालकमंत्री बडोले म्हणाले, पांदण रस्त्यांच्या सुविधेमुळे शेतकऱ्यांना शेतातील उत्पादित माल बाजारपेठेत सहजपणे घेऊन जाणे शक्य होईल. कनेरीत कोणीही बेघर व्यक्ती घरकुलाच्या लाभापासून वंचित राहणार नाही, यासाठी पंचायत समतीने लक्ष द्यावे. सर्व समाजातील व्यक्तींसाठी असलेल्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी यंत्रणांनी नियोजन करावे, असे ते म्हणाले.
डॉ. सूर्यवंशी म्हणाले, आरोग्य विभागाच्या विविध योजना गावात प्रभावीपणे राबवाव्यात.
खरा लाभार्थी हा योजनेपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घ्यावी. शाळेतील सर्व मुले स्कॉलरशिप परीक्षेला बसली पाहिजे, याचे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना दिल्या.
सभेला जिल्हा नियोजन अधिकारी बकुल घाटे, मत्स्य व्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त समीर परवेज, वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता वाकडे, आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या प्रभारी प्रकल्प अधिकारी मीनाक्षी उन्हाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बागडे, देशमुख, लघू पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता कठाडे, तहसीलदार परळीकर, प्रभारी गटविकास अधिकारी झामिसंग टेंभरे, तालुका कृषी अधिकारी पेशट्टीवार, क्रीडा अधिकारी निमगडे यांच्यासह जिल्हा व तालुकास्तरीय यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)