विद्यार्थ्यांसाठी आता ‘चला करुया अभ्यास’ उपक्रम; शिक्षक जाणार विद्यार्थ्यांच्या घरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 08:36 AM2021-06-24T08:36:00+5:302021-06-24T08:37:35+5:30
गोंदिया जिल्ह्यात विद्यार्थ्यांना शाळेत न बोलविता शिक्षकच आता विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत पोहोचून त्यांचा नियमित गृहपाठ घेणार आहेत. जि.प.शिक्षण विभागाने यासाठी ‘चला करुया अभ्यास’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे.
अंकुश गुंडावार
गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असला तरी २८ जूनपासून प्रत्यक्षात ऑफलाइन शाळा सुरू होण्याची शक्यता कमी आहे. त्यातच ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थी शिक्षणापासून दूर जात आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत न बोलविता शिक्षकच आता विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत पोहोचून त्यांचा नियमित गृहपाठ घेणार आहेत. जि.प.शिक्षण विभागाने यासाठी ‘चला करुया अभ्यास’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे.
मागील दीड वर्षांपासून राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थी शाळेपासून दूरच आहेत. ऑनलाइनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकविले जात होते; परंतु ऑनलाइन शिक्षणामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शिक्षणाप्रती रुची कमी झाल्याची बाब पुुढे आली आहे. तर २०२१-२२ या शैक्षणिक सत्रातसुद्धा शाळा विद्यार्थ्यांविना हीच स्थिती राहण्याची शक्यता आहे; मात्र विद्यार्थ्यांची अभ्यासाची रुची कमी होऊ नये, यासाठी गोंदिया जि.प. शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना शाळेत बोलविता त्यांच्या घरापर्यंत पोहोचत ‘चला करुया अभ्यास’ हा नाविण्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. यांतर्गत विद्यार्थ्यांच्या मागील इयत्ताच्या अभ्यासाचे नियोजन करणे, दररोज गृहभेटी करून अभ्यास करणे, शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरुन काढणे, अभ्यासातील रुची वाढविणे, विद्यार्थ्यांच्या तयारीसाठी ब्रिज कोर्स व शैक्षणिक दिनदर्शिकेचा वापर, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, ग्रामीण भागात कोविड काळात ऑनलाइन शिक्षणाला पर्याय तयार करणे, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मूल्यमापन करून स्तरनिहाय उपाययोजना करणे आदी उपक्रम राबविण्यात येणार आहे.
शाळेच्या पहिल्याच दिवसापासून अभ्यासक्रम
२८ जूनपासून सर्व शाळा सुरू ऑनलाइन सुरू होणार आहे. शाळेच्या पहिल्याच दिवसांपासून इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा गणित, भाषा, विज्ञान व इंग्रजी विषयाचा नियमित अभ्यास करून घेण्यासाठी वर्गशिक्षकांद्वारे दररोज गृहभेटी घेऊन त्यांचा नियमित अभ्यास घेऊन शिक्षणाच्या प्रवाहात आणले जाणार आहे. मुख्याध्यापकांद्वारे शिक्षकांच्या भेटींचे दररोज नियोजन केले जाणार आहे.
जिल्हा स्तरावर कोअर टीम
‘चला करुया अभ्यास’ या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरावर कोअर टीम तयार करण्यात आली आहे. या टीमद्वारे या उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाणार आहे, तसेच वेळोवेळी मार्गदर्शन आणि मूल्यमापन करण्याची जबाबदारी या टीमवर देण्यात आली. जिल्हास्तरीय समन्वयक अनिल चव्हाण व समन्वयक म्हणून बाळकृष्ण बिसेन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
असा आहे या उपक्रमाचा कालावधी
‘चला करुया अभ्यास’ या उपक्रमाचा कालावधी २८ जून ते पुढे ४५ दिवस ब्रिज कोर्स आधारित मार्गदर्शन व मूल्यमापन होणार आहे. १० ऑगस्टपासून पुढे शैक्षणिक दिनदर्शिकेवर आधारित मार्गदर्शन व मूल्यमापन करण्यात येणार आहे. एकंदरीत नियमित गृहभेटी देऊन शिक्षण विद्यार्थ्यांचा अभ्यास घेणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांवरसुद्धा वचक राहणार आहे.
जिल्हा परिषदेच्या एकूण १०३९ शाळांमध्ये २८ जूनपासून चला करुया अभ्यास हा नाविण्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची शिक्षणाप्रती रुची कमी होऊ नये, त्यांची अभ्यासाची सवय कायम राहावी, यासाठी हा उपक्रम जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी प्रदीपकुमार डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. दर पंधरा दिवसांनी यांचे मूल्यमापन केले जाईल.
- राजकुमार हिवारे, शिक्षणाधिकारी.
-