रूपया न देता ‘सर्वोत्तम घर बांधकाम’ मोहिमेचे पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2019 06:00 AM2019-12-07T06:00:00+5:302019-12-07T06:00:11+5:30
सर्वांना हक्काचे पक्के घर या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी देशात प्रधानमंत्री आवास योजना शहर व ग्रामीण राबविली जात आहे. शहरात नगर परिषदेच्या माध्यमातून ही योजना राबविली जात असून योजनेचा संपूर्ण कारभार नगर परिषद करीत आहे. चार घटकांतून राबविल्या जात असलेल्या या योजनेंतर्गत गोंदिया नगर परिषदेला सात हजार २२० आवासांचे टार्गेट देण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : घरकुल बांधकामासाठी शासनाकडून एक रूपयाही मिळाला नसताना प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) विभागाकडून लाभार्थ्यांना ‘सर्वोत्तम घर बांधकाम’ मोहिमेचे पत्र पाठविले जात आहे. विशेष म्हणजे, घरकुल मंजूर झालेल्यांच्या यादीतील सर्वांनाच हे पत्र पाठविले जात असून यातून शासन लाभार्थ्यांची एकप्रकारे थट्टाच करीत असल्याच्या प्रतिक्रिया लाभार्थी व्यक्त करीत आहेत. शिवाय या पत्रामुळे लाभार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
सर्वांना हक्काचे पक्के घर या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी देशात प्रधानमंत्री आवास योजना शहर व ग्रामीण राबविली जात आहे. शहरात नगर परिषदेच्या माध्यमातून ही योजना राबविली जात असून योजनेचा संपूर्ण कारभार नगर परिषद करीत आहे. चार घटकांतून राबविल्या जात असलेल्या या योजनेंतर्गत गोंदिया नगर परिषदेला सात हजार २२० आवासांचे टार्गेट देण्यात आले आहे. मात्र नगर परिषदेच्या माध्यमातून सध्या ‘आर्थिक दृष्टया दुर्बल घटकातील वैयक्तीक स्वरूपात घरकुल बांधकामासाठी अनुदान’ या घटक क्रमांक-४ अंतर्गत घरकुल बांधकामांना मंजुरी दिली जात आहे.
या घटकांतर्गत नगर परिषदेच्या ५१५ व ५२० अशा दोन सविस्तर प्रकल्प अहवालांना मंजुरी मिळाली आहे. यातील पहिल्या ५१५ लाभार्थ्यांच्या प्रकल्प अहवालातील सुमारे ३६० लाभार्थ्यांना अनुदानाचा पहिला हप्ता, सुमारे ३०७ लाभार्थ्यांना दुसरा हप्ता देण्यात आला आहे. तर सुमारे १५५ लाभार्थ्यांना अद्याप एकही रूपया देण्यात आलेला नाही. असे असतानाही, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) विभागाकडून मात्र सर्वच लाभार्थ्यांचे घरकुल बांधकाम पूर्ण झाले असावे असे गृहीत धरून ‘सर्वोत्तम घर बांधकाम’ मोहिमेचे पत्र पाठविले जात आहे.
एक रूपयाही मिळाला नसताना लाभार्थी घराचे बांधकाम कसे पूर्ण करू शकेल असा प्रश्न येथे उपस्थित होतो. वास्तविक, घरकुल मंजुरीच्या यादीत नाव आल्याने कित्येकांनी आता अनुदान मिळणार या आशेतून घर उघडून टाकले आहे. मात्र अनुदान मिळाले नसल्याने ते उघड्यावर आले आहेत. अशात मात्र यादीत घरकुल बांधकाम पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांची यादी न मागविता शासनाकडून थेट यादीतील सर्वांनाच पत्र पाठविले जात आहे. या प्रकारामुळे लाभार्थ्यांत चांगलाच रोष निर्माण झाला असून शासन आमची थट्टा करीत आहे अशा प्रतिक्रीया व्यक्त करीत आहेत.
काय आहे ‘सर्वोत्तम घर बांधकाम’ योजना
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पीएमवाय (यू) अवॉर्ड -२०१९ योजनेंतर्गत ‘सर्वोत्तम घर बांधकाम’ शोधण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. यामध्ये संपूर्ण बांधकाम झालेल्या घरांना हा पुरस्कार दिला जाणार आहे. याकरीता योजनाचा मोबाईल अॅप डाऊनलोड करून लाभार्थीला कुटुंबासह घराचे फोटे अपलोड करावयाचे आहे.
अनुदानाला घेऊन लाभार्थी संभ्रमात
विभागाकडून लाभार्थ्यांना ‘सर्वोत्तम घर बांधकाम’ मोहिमेबाबत पत्र पाठविण्यात आले आहे. अशात लाभार्थी मात्र संभ्रमात अडकले आहेत. शासनाने पत्र पाठवून घर बांधकाम झाल्याचे कळविले असे त्यांना वाटत आहे. अशात आता आम्हाला पैसे मिळणार की नाही असेही त्यांना वाटू लागले आहे. संबंधित विभागाकडून सर्वांनाच हे पत्र पाठविण्यात आले असल्याचे सांगूनही त्यांना मात्र धडकी भरली आहे.