प्लास्टीक बंदीसाठी धडकले पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 06:00 AM2020-02-12T06:00:00+5:302020-02-12T06:00:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : पर्यावरणाला सर्वाधिक घातक ठरत असलेल्या प्लास्टीकच्या वापरावर राज्यात बंदी घालण्यात आली आहे. असे असले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : पर्यावरणाला सर्वाधिक घातक ठरत असलेल्या प्लास्टीकच्या वापरावर राज्यात बंदी घालण्यात आली आहे. असे असले तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने प्लास्टीकचा वापर सुरूच आहे. ही बाब गांभीर्याने घेत पर्यावरण मंत्र्यांनी राज्यात पूर्णपणे प्लास्टीक बंदीचे निर्देश दिले आहेत. त्यानुषंगाने, नगर परिषद प्रशासन विभागीय आयुक्त कार्यालयाने प्लास्टीक निर्बंधाबाबत प्रभावी अंमलबजावणीचा कृती आराखडा तयार करण्याबाबत पत्र धाडले आहे. नगर परिषदेला त्यानुसार प्लास्टीक निर्मुलनासाठी पथक व संबंधित अन्य विषयांना घेऊन आराखडा तयार करायचा आहे. प्लास्टीकचे पर्यावरणावरील दुष्परिणाम लक्षात घेत राज्यात प्लास्टीक बंदी करण्यात आली आहे. चार दिवस कारवाया केल्यानंतर मोहीम थंडावत असल्याने प्लास्टीकचा वापर सर्रास सुरू आहे. त्यातही प्लास्टीक पिशव्या सर्वाधिक घातक ठरत असतानाही त्यांचा वापर उघडपणे दिसून येत आहे. परिणामी प्लास्टीक बंदीचा राज्यात पार फज्जा उडत असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही. हीच बाब हेरून पर्यावरण मंत्र्यांनी प्लास्टीक बंदीच्या अंमलबजावणीचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार, नगर परिषद प्रशासनाकडून जिल्हाधिकारी व नगर परिषदांना पत्र धाडण्यात आले आहे. या पत्रानुसार, नगर परिषदेला शहर व शहरालगत क्षेत्रात अस्तीत्वात असलेले सर्वप्रकारचे प्लास्टीक उचलून त्यांची विल्हेवाट लावायची आहे. सिंगल यूज प्लास्टीक वापर न करण्याबाबत स्वत: बंधन टाकून त्याचे काटेकोरपणे पालन करायचे आहे. प्लास्टीक पिशव्यांचा उपयोग करणार नाही व करून देणार नाही याचा प्रत्येकाने निर्धार करून प्रचार-प्रसार करायचा आहे. कापडी पिशव्यांचा वापर करणे व त्यांच्या निर्मितीसाठी आवश्यक कृती करायची आहे. प्लास्टीकचा वापर करणाऱ्यांचे नाव व ठिकाण प्लास्टीक निर्बंध यंत्रणेला कळविण्यासाठी विशिष्ट दूरध्वनी, भ्रमणध्वनी क्रमांक, वेबसाईट उपलब्ध करून त्यावर तक्रारी नोंदविण्यासाठी जनतेला आवाहन करायचे आहे.
जनजागृती कार्यक्रमांवर भर
याशिवाय, कार्यक्षेत्रात निर्बंध टाकलेल्या प्लास्टीकच्या वस्तू तयार, उत्पादीत, वापर, विक्री, वाहतूक, साठवणूक होणार याची याकरीता जागरूक राहून अशा व्यक्ती, संस्था, दुकाने व व्यापाऱ्यांवर सातत्याने लक्ष देऊन दंडात्मक कार्यवाही करून त्यास प्रसिद्धी द्यायची आहे. प्लास्टीकचा वापर करण्यापासून नागरिकांना परावृत्त करण्यासाठी जनजागृती व इतर कार्यकम घ्यायचे आहेत.
यांचा सक्रिय सहभाग घेता येणार
महाराष्ट्र राज्य ‘सिंगल यूज’प्लास्टीक मुक्त राज्य करावयाचे असल्याने या मोहीमेत जास्तीत जास्त लोकांचा सक्रिय सहभाग घेता येणार आहे. यात शासकीय कार्यालये, शाळा-महाविद्यालय, गृहनिर्माण संस्था, विविध संस्था, युवकांचे मंडळ, एनएसएस, एनसीसी, लायंस क्लब, रोटरी क्लब, सेवाभावी संस्था, व्यापारी-उद्योग-व्यावसायीक मंडळ, बचतगट, लॉन व मंगल कार्यालये, मंडप डेकोरेशन व्यावसायी, हॉटेल, उपहारगृहे, छोट्या टपºया, पानठेले, रेल्वे स्थानक, कृषी उत्पन्न बाजार समिती, भाजीपाला मार्केट, मांस विक्रेते आदिंच्या बैठका घेऊन त्यांना सहभागी करता येईल.