निलंबनाच्या धास्तीने बिट काढण्याचे पोलिसांचे पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 12:21 AM2018-09-09T00:21:50+5:302018-09-09T00:22:47+5:30
शहरातील अवैध व्यावसायीकांना अभय देण्याचा ठपका ठेवत गोंदिया शहर व रामनगर पोलीस ठाण्यातील आठ पोलीस कर्मचाऱ्यांना गुरूवारी निलंबित करण्यात आले. या निलंबनाचा धसका घेत आमच्यावरही निलंबनाची पाळी येऊ नये,......
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरातील अवैध व्यावसायीकांना अभय देण्याचा ठपका ठेवत गोंदिया शहर व रामनगर पोलीस ठाण्यातील आठ पोलीस कर्मचाऱ्यांना गुरूवारी निलंबित करण्यात आले. या निलंबनाचा धसका घेत आमच्यावरही निलंबनाची पाळी येऊ नये, म्हणून गोंदिया शहर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी बिटाचे काम आम्हाला नको म्हणून ठाणेदाराला अर्ज केल्याची माहिती आहे.
गोंदिया शहर वरामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुगार अड्डे, दारू, सट्टापट्टी व इतर अवैध धंदे सुरू होते. तेथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जाऊन कारवाई केली. त्यामुळे ज्यांच्या बिटात हे धंदे सुरू होते त्या पोलिसांवर पोलिस अधीक्षकांनी निलंबनाची कारवाई केली आहे.
यात रामनगर पोलीस ठाण्यात कार्यरत बीट क्र. २ येथील पोलीस हवालदार कृष्णराम खेमराज ठाकरे बक्कल क्र.२९८, प्रितमकुमार खामले बक्कल क्र.७५१, अनिल पारधी बक्कल क्र. ६७१, हिरादास पिल्लारे बक्कल क्र. ५३०, गोंदिया शहर पोलीस ठाण्यातील बीट क्र.१ छोटा गोंदियाचे बीट जमादार पोलीस हवालदार सुरेश मेश्राम बक्कल क्र. ७१२, बीट क्र. २ सराफा लाईनचे बीट जमादार सहाय्यक फौजदार मारोती गोमासे बक्कल क्र. ४२५, राजानंद वासनिक बक्कल क्र. ७५५ व बीट क्र.३ गणेशनगर सांभाळणारे पोलीस हवालदार इंदल आडे बक्कल क्र. ४८५ यांचा समावेश आहे. पोलीस अधिक्षकांच्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील पोलीस चांगलेच धास्तावलेल आहे. स्थानिक गुन्हे शाखा जिथे-जिथे कारवाई करेल तिथल्या पोलिसांना निलंबनाचा फटका बसेल का ही धास्ती त्यांच्या मनात आहे.
या भितीपोटी गोंदिया शहरातील ज्या बीटातील हवालदारांना निलंबित केले. त्या बिटातील इतर कर्मचाऱ्यांना आम्हाला सामन्य ड्युटी द्या बीट देऊ नका, अन्यथा मुख्यालयात जमा करा अशी विनंती अर्ज ठाणेदाराला लिहिला आहे. गोंदिया शहर व रामनगर या पोलीस ठाण्यातील पाच सर्कलमध्ये काम करणारे २६ लोक असताना फक्त ८ जणांवरच निलंबन झाल्याने निलंबन होणारे कर्मचारी मानसिक तणावात आले आहेत. हवालदार मेश्राम, इंदल आडे व खांबले हे मुख्यालयाचे कर्मचारी होते. त्यांना मदत करण्यासाठी प्रतिनियुक्तीवर पोलीस ठाण्यात देण्यात आले.मुख्यालयातील व्यक्तीवर सर्कलचा कारभार देता येत नाही,असे कर्मचाºयांचे म्हणणे आहे. परंतु निलंबित झालेल्या या कर्मचाºयांवर सर्कलचा प्रभार होता.
मनुष्यबळाचा अभाव असल्यामुळे त्यांच्यावर सर्कलचे काम देण्यात आल्याचे समजते. रामनगरातील हवालदार कृष्णककुमार ठाकरे यांची बदली चिचगड येथे झाली होती. परंतु मनुष्यबळाचा अभाव दाखवून ठाणेदाराने त्यांना न सोडल्यामुळे त्यांना निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले.