सहा दारू दुकानांचे परवाने केले निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:33 AM2021-05-25T04:33:03+5:302021-05-25T04:33:03+5:30
नरेश रहिले गोंदिया : कोरोनाच्या काळात सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल देणारा मार्ग म्हणजे दारू असला तरी दारू दुकानांच्या मालकांनी ...
नरेश रहिले
गोंदिया : कोरोनाच्या काळात सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल देणारा मार्ग म्हणजे दारू असला तरी दारू दुकानांच्या मालकांनी नियमातच राहून आपली दारूविक्री करावी, अशा सूचना शासन व जिल्हा प्रशासनाने केल्या होत्या. परंतु, या आदेशाचे पालन न करता आपला मनमर्जी कारभार करणाऱ्या सहा दारू दुकानांचे परवाने जिल्हाधिकारी दीपककुमार मीना यांनी निलंबित केले आहे.
दारूपासून महसूल मोठ्या प्रमाणात मिळतो आणि तळीरामांना घराबाहेर न निघता त्यांना घरपोच दारू मिळावी म्हणून दुसऱ्या लाटेत संचारबंदीच्या काळात दारूची ‘होम डिलिव्हरी’ करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मीना यांनी काढले. त्यानुसार सर्व दारू दुकानदारांनी आपापल्या ग्राहकांसाठी संपर्क क्रमांक पाठविले. कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून दारूची होम डिलिव्हरी करण्याचे आदेश दिल्याने परवानाधारक व्यक्ती दारूची वाहतूक करून घरपोच सेवा देत आहेत. कुठल्याही आस्थापनेत (अनुज्ञप्ती) दारूविक्री करायची नाही किंवा दुकानात दारू पिण्यास द्यायची नाही, असे आदेश असताना जिल्ह्यातील बहुतांश दारू दुकानदारांनी या नियमांचे पालन करून कोट्यवधींची दारूविक्री केली. परंतु, काही दारू दुकानदारांनी आपल्या दुकानातूनच दारूविक्री केली व ग्राहकांना दारू दुकानात दारू पिण्यासाठी दिली.
ही बाब राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लक्षात आल्याने त्यांनी जिल्ह्यातील दारू दुकानांवर कारवाई केली आहे. ज्या दारू दुकानांच्या परवान्यांचे निलंबन झाले, त्यांना कोरोनाची संचारबंदी असेपर्यंत दारूविक्री करता येणार नाही, असा आदेश काढण्यात आला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत दीड महिना दारू दुकाने बंद होती. त्यानंतर दारू दुकाने सुरू झाल्याने दारू दुकानांच्या समोर पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. दुसऱ्या लाटेत तळीरामांची चिंता करीत त्यांना घरपोच सेवा मिळावी म्हणून दुकानदारच ग्राहकांच्या दारी गेले. परंतु, काही दुकानदारांनी दुकानातूनच मालविक्री केल्यामुळे त्यांचे परवाने निलंबित करण्यात आले. ४ एप्रिल ते २० मे दरम्यान ही कारवाई करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रवीण तांबे यांनी दिली आहे.
...........................
बॉक्स
या दारू दुकानांचे परवाने निलंबित
जिल्हा प्रशासनाचे आदेश न पाळणाऱ्या जिल्ह्यातील सहा दारू दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये येथील मराठा बार ॲण्ड रेस्टॉरंट (एलएल-३) श्रीनगर, सम्राट बार ॲण्ड रेस्टॉरंट (एलएल-३) साखरीटोला (सालेकसा),सेंटर बार ॲण्ड रेस्टॉरंट (एलएल-३) मरारटोली गोंदिया, लकी बार ॲण्ड रेस्टॉरंट (एलएल-३) आमगाव, देशी दारू दुकान कुणबीटोला (सालेकसा) व देशी दारू दुकान कारूटोला (सालेकसा) यांचा समावेश आहे.