झेडपीत पुन्हा हातात कमळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 10:28 PM2018-01-15T22:28:31+5:302018-01-15T22:29:18+5:30
अडीच वर्षांपूर्वीचेच समीकरण कायम : राष्ट्रवादी सत्तेपासून दूर, आगामी निवडणुकांवर होणार परिणाम
आॅनलाईन लोकमत
गोंदिया : जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षाचा अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने पुढील अडीच वर्षाच्या कालावधीसाठी सोमवारी (दि.१५) निवडणूक घेण्यात आली. यात काँग्रेसने जि.प.मधील भाजपसोबतची युती कायम ठेवली. अध्यक्षपदी काँग्रेसच्या सीमा मडावी तर उपाध्यक्षपदी भाजपाचे हमीद अल्ताफ अकबरअली यांची निवड करण्यात आली. त्यामुळे झेडपीत पुन्हा हातात कमळाचे चित्र कायम राहिले.
जि.प. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीला घेवून जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. सध्या राज्यातच नव्हे तर देशभरात काँग्रेस-भाजप असे विरोधी चित्र आहे. त्यामुळे गोंदिया जि.प.च्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडी होण्याची चर्चा होती. जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल पाहता काँग्रेसचे १६, राष्ट्रवादी काँग्रेचे २० आणि भाजपाचे १७ सदस्य असे एकूण ५३ सदस्य आहे. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन सहजपणे सत्ता स्थापन करु शकले असते. मात्र मागील अडीच वर्षांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक वरिष्ठ नेत्यांमध्ये अतर्गंत कलह आहे. तर तीन दिवसांपूर्वी झालेल्या पंचायत समिती निवडणुकी दरम्यान या दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये पत्रकबाजी झाली. त्यामुळे याचे परिणाम जि. प.निवडणुकीवर होण्याची शक्यता वर्तविली जात होती. ती सोमवारी (दि.१५) घेण्यात आलेल्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत खरी देखील ठरली. काँग्रेसने समविचार पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करण्याऐवजी केवळ राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपसोबत अभद्र युती करुन जि.प.मध्ये सत्ता स्थापन करण्याला पुन्हा पसंती दिली. अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवडणूक प्रक्रियेला सोमवारी दुपारी १२ वाजतापासून सुरूवात झाली. अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून सीमा मडावी, राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनिता मडावी, तर भाजपकडून रजनी कुमरे यांनी नामांकन दाखल केले. तर उपाध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून रमेश अंबुले, राष्ट्रवादी काँग्रेसकडून गंगाधर परशुरामकर आणि भाजपाकडून हमीद अल्ताफ अकबरअली यांनी नामाकंन दाखल केले. त्यामुळे नेमके काय घडेल हे सांगता येणे कठिण होते. मात्र दुपारी ३ वाजता भाजपाच्या रजनी कुमरे यांनी अध्यक्षपदाचा व काँग्रेसचे उपाध्यक्षपदाचा रमेश अंबुले यांनी नामाकंन अर्ज मागे घेतले त्यामुळे अर्धे चित्र स्पष्ट झाले. त्यानंतर सभागृहात अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी हात उंचावून मतदान घेण्यात आले. यात अध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या सीमा मडावी यांना ३३ मते तर राष्ट्रवादी कॉग्रेसच्या सुनिता मडावी यांना २० मते मिळाली. त्यामुळे सीमा मडावी यांना विजयी घोषीत करण्यात आले. उपाध्यक्षपदासाठी भाजपाचे हमीद अल्ताफ अकबरअली यांना ३३ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे गंगाधर परशुरामकर यांना २० मते मिळाली. त्यामुळे हमीद अल्ताफ अकबरअली यांना निवडणूक निर्णय अधिकारी अतिरिक्त जिल्हाधिकारी अशोक लटारे विजयी घोषीत केले. दोन्ही पदाधिकाऱ्यांच्या विजयाची घोषणा होताच काँग्रेस व भाजपाच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व गुलाल उधळून आनंद साजरा केला. जि.प.मध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेसकडे पुरेसे संख्याबळ नसताना आ.गोपालदास अग्रवाल यांनी यशस्वी खेळी खेळत जि.प.चे अध्यक्षपद काँग्रेसकडे खेचून आणले. हे विशेष.
सर्वांना सोबत घेऊन काम करणार- सीमा मडावी
जि.प.अध्यक्षपदी विराजमान झालेल्या सीमा मडावी यांनी विजयानंतर पत्रकारांशी बोलताना जिल्हा परिषदेत सर्वांना घेवून कामे करणार. राजकारणापेक्षा जिल्ह्याच्या विकास कामाला प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. मात्र समविचारी पक्षाऐवजी भाजपासोबत केलेल्या अभद्र युतीसंदर्भात त्यांनी राज्यात इतर भागात असे प्रकार झाले असल्याचे सांगितले.
मिळालेल्या संधीचा पुरेपूर उपयोग करणार- हमीद अल्ताफ अकबरअली
पक्षाने दिलेल्या संधीमुळे उपाध्यक्षपदी विराजमान होण्याची संधी मिळाली आहे. या संधीचा पुरेपूर उपयोग करुन जिल्ह्याचा सर्वांगीन विकास साधण्याला प्राधान्य देणार असल्याचे हमीद अल्ताफ अकबरअली यांनी सांगितले.
अडीच वर्षांपूर्वीचा धर्म पाळला - आ.फुके
गोंदिया जि.प.मध्ये अडीच वर्षांपूर्वी काँग्रेस-भाजपने युती करुन सत्ता स्थापन केली. तीच युती अडीच वर्षांनंतर कायम ठेवून युती धर्म पाळल्याचे भाजपाचे आ.परिणय फुके यांनी सांगितले.
स्थानिक नेते जिल्हा काँग्रेसमुक्त करण्याच्या मार्गावर - परशुरामकर
पंतप्रधान नरेंद्र मोंदी देश काँग्रेस मुक्त करण्याचा नारा देत आहे. मात्र गोंदियातील स्थानिक काँग्रेस नेते भाजपासोबत युती करुन जिल्हा काँग्रेसमुक्त करण्याचा प्रयत्न करीत आहे. जि.प.मध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी राष्टÑवादीने काँग्रेसपुढे सर्व पर्याय खुले ठेवले होते. काँग्रेसचे निरीक्षक हर्षवर्धन सपकाळ व अतुल लोंढे यांनी देखील प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या निर्देशानुसार स्थानिक काँग्रेस नेत्यांना समविचारी पक्षासोबत आघाडी करण्याचे निर्देश दिले होते. मात्र स्थानिक नेत्यांनी ते निर्देश सुध्दा पाळले नसल्याचा आरोप राष्टÑवादी काँग्रेसचे गटनेते गंगाधर परशुरामकर यांनी केला.
भाजप कार्यकर्त्यात नाराजीचा सूर
जि.प.मध्ये भाजपने काँग्रेससोबत अभद्र युती करुन सत्ता स्थापन केल्याने स्थानिक भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर होता. जि.प.च्या बाहेर उभ्या असलेल्या काही कार्यकर्त्यांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला. तर काही नेत्यांच्या चेहऱ्यांवर देखील नाराजी दिसून येत होती.