समग्र शिक्षा अभियानातून फुलतेय २८० दिव्यांगांचे जीवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 10:35 PM2019-05-13T22:35:44+5:302019-05-13T22:35:58+5:30
दिव्यांगाचे जीवन सर्व सामान्य माणसांसारखेच असावे यासाठी त्यांचे जीवन फुलविण्यासाठी समग्र शिक्षा अभियानातर्फे उन्हाळी शिबिराचे आयोजन ५० दिवसासाठी घेण्यात येत आहे. १ मे पासून सुरू झालेले हे शिबिर तब्बल २२ जून पर्यंत घेण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : दिव्यांगाचे जीवन सर्व सामान्य माणसांसारखेच असावे यासाठी त्यांचे जीवन फुलविण्यासाठी समग्र शिक्षा अभियानातर्फे उन्हाळी शिबिराचे आयोजन ५० दिवसासाठी घेण्यात येत आहे. १ मे पासून सुरू झालेले हे शिबिर तब्बल २२ जून पर्यंत घेण्यात येत आहे. दिव्यांगाना व्यावसायीक शिक्षण देत २८ अंध मुलांसाठी ब्रेल पूर्व वाचनाचे आयोजन करण्यात आले आहे.या दिव्यांगासाठी विशेष शिक्षीका बोलाविण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात पहिल्यांदाच शिवणकाम व पिको फॉल प्रशिक्षण दिले जात आहे.
दिव्यांग विद्यार्थ्यांना शाळा पूर्व तयारी, किमान कौशल्य विकास प्रशिक्षण, ब्रेलपूर्व वाचन, शिवणकाम शिकविण्यासाठी तब्बल ५० दिवसासाठी आयोजित या प्रशिक्षणाला जिल्हाभरातील २८० दिव्यांग विद्यार्थ्यांची हजेरी लावली आहे. पहिल्या वर्गात दाखल झालेल्या ८७ दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शाळा पूर्व तयारी केली जात आहे. वर्ग ८ ते १२ वीच्या ९४ दिव्यांगाना किमान कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येत आहे. ७१ कर्णबधीरांना शिवणकाम व पिको फॉलचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.
मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ.राजा दयानिधी, शिक्षण सभापती रमेश अंबुले, प्राथमिक शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांच्या मार्गदर्शनातून या दिव्यांगाच्या उत्थानासाठी जिल्हा परिषदेचा समग्र शिक्षा अभियानाचे समन्वयक विजय ठोकणे काम करीत आहेत. यामुळे दिव्यांगाना आधार मिळत आहे.