रक्तदानाने दुसऱ्याचे जीवन फुलते
By admin | Published: January 16, 2017 12:23 AM2017-01-16T00:23:23+5:302017-01-16T00:23:23+5:30
आपल्या मदतीने मृत्युशय्येवर असलेल्या एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या चेहऱ्यावर नवसंजीवनीचे हास्य फुलण्याचे भाग्य
राजेश चांडक यांचे प्रतिपादन : ८५ विद्यार्थ्यांनी केले शिबिरात रक्तदान
बोंडगावदेवी : आपल्या मदतीने मृत्युशय्येवर असलेल्या एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या चेहऱ्यावर नवसंजीवनीचे हास्य फुलण्याचे भाग्य लाभणे हेच महत्तम कार्य आहे. सर्व दानात रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. आपण केलेल्या रक्तदानामुळे दुसऱ्यांचे जिवन फुलविण्याचे महान पुण्य मिळत असल्याचे मत रासेयोचे शिबिर प्रमुख डॉ. राजेश चांडक यांनी व्यक्त केले.
स्थानिक बाजारचौक स्थित सार्वजनिक समाज मंदिरात राज्यस्तरीय राष्ट्रीय सेवा योजना शिबिरांतर्गत आयोजीत रक्तदान शिबिरात ते बोलत होते. रक्तदान शिबिराच्या शुभारंभाप्रसंगी एस.एस.जे.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजीव पाटणकर, सरपंच राधेशाम झोळे, तंमुस अध्यक्ष तुळशीदास बोरकर, रक्त संक्रमण केंद्राचे प्रवीण साठवणे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कुंदन कुलसुंगे, राज्यस्तरीय रासेयो शिबिर प्रमुख डॉ. राजेश चांडक, डॉ. शरद मेश्राम, प्रा.आशिष कावळे, डॉ.पी.एस.डांगे, डॉ. दिलीप काकडे उपस्थित होते.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कर्मयोगी गाडगेबाबा यांच्या प्रतिमेसमोर दिप प्रज्वलनाने रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. पुढे बोलताना चांडक यांनी, घरी आलेल्या भिकाऱ्याला अन्नधान्य देणे तसेच आत्मस्वकीयांना संकटकाळात सर्वत्तोपरी मदत करण्यासाठी हात पुढे करण्याची गरज आहे. विविध ठिकाणी दान करणे ही आता सर्वसामान्य बाब झाली आहे. मात्र आपण केलेल्या एखाद्या मदतीने दुसऱ्या व्यक्तीच्या जीवनात नवचैतन्य निर्माण होणे हे महत्वाचे असे मत व्यक्त केले.
आजचा युवक समाजाचा आधारस्तंभ आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून समाजाच्या फार अपेक्षा असतात. ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या ओळखून युवकांनी पुढे यावे. रक्तदान या राष्ट्रीय कार्यात युवकांनी सहभागी होऊन स्वयंप्रेरणेने रक्तदान करण्यास तत्पर असावे. तुम्ही केलेल्या रक्तदानामुळे अनेकांना जीवदान मिळू शकते असेही मत डॉ. चांडक यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी समाजासाठी आपलेही काही देणे लागते याचे भान ठेवण्याचे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य पाटणकर यांनी केले. याप्रसंगी ८५ जणांनी रक्तदान केले. ग्रामोन्नतीकरीता युवाशक्ती या संकल्पनेवर आधारीत असलेल्या रासेयोच्या शिबिरामध्ये राज्यातील विविध विद्यापीठांमधून जवळपास २५० शिबिरार्थी सहभागी झाले आहेत. रक्तदान शिबिराच्या आयोजनासाठी डॉ. शरद मेश्राम, प्रा.आशिष कावळे, देवदास बाळबुध्दे यांनी सहकार्य केले.(वार्ताहर)