महिलेची हत्या करणाऱ्यास आजन्म कारावास; जिल्हा न्यायालयाने सुनावला आदेश
By कपिल केकत | Published: March 21, 2024 07:34 PM2024-03-21T19:34:36+5:302024-03-21T19:34:51+5:30
शेतात गुरे चारण्यासाठी गेलेल्या महिलेला गंभीर जखमी करून तिच्या अंगावरील दागिने घेऊन पसार झाला.
गोंदिया: शेतात गुरे चारण्यासाठी गेलेल्या महिलेला गंभीर जखमी करून तिच्या अंगावरील दागिने घेऊन पसार झाला. मात्र, उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाल्याने तिच्या हत्येच्या प्रकरणात न्यायालयाने आरोपीला आजन्म सश्रम कारावास व दंडाची शिक्षा सुनावली. जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एम. खान यांनी गुरुवारी (दि. २१) आपला अंतिम आदेश सुनावला आहे. यशवंत भाऊलाल लिल्हारे (३२, रा. पिपरिया, ता. तिरोडा) असे आरोपीचे नाव आहे.
फिर्यादी तेजराम तुलाराम सेलोकर (५०, रा. खैरलांजी, तिरोडा) यांच्या पत्नी अंतकला तेजराम सेलोकर (४३) या ११ एप्रिल २०१९ रोजी गुरे-ढोरे चारण्यासाठी सकाळी ८ वाजतादरम्यान शेतात गेल्या होत्या. यावेळी त्यांना एकटी पाहून आरोपी यशवंत लिल्हारे याने त्यांच्या डोक्यावर, गळ्यावर व चेहऱ्यावर काठी व धारदार वस्तूने मारून गंभीर जखमी केले. तसेच त्यांच्या गळ्यातील ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र व सोन्याचे २० मणी असे एकूण २१ हजार रुपये किमतीचे दागिने बळजबरीने अंगातून काढून पळून गेला होता. गावातील अरविंद भगत यांना अंतकला या जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या दिसल्याने त्यांनी याबाबत फिर्यादी तुलाराम व त्यांच्या मुलाला माहिती दिली.
यावरून फिर्यादी घटनास्थळी गेले असता अंतकला यांनी संपूर्ण प्रकार सांगितला. अंतकला यांना उपचारासाठी येथील बजाज सेंट्रल हॉस्पिटलमध्ये दुपारी २.५० वाजता भरती केले होते. परंतु, प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचाराकरिता नागपूर येथील शासकीय महाविद्यालयात भरती करण्यात आले. मात्र, २१ मे २०१९ रोजी अंतकला यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी तेजराम सेलोकर यांनी दवनीवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली असता पोलिसांनी भादंवि कलम ३०२, ३९७ अंतर्गत गुन्हा नोंदविला होता.
या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक जयदीप दळवी यांनी करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. न्यायालयात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील व सरकारी अभियोक्ता महेश चंदवानी व अति. सरकारी अभियोक्ता कृष्णा पारधी यांनी एकूण १८ साक्षीदारांची साक्ष न्यायालयासमोर नोंदवून घेतली. सविस्तर युक्तिवादानंतर तसेच कागदोपत्री पुरावा व वैद्यकीय अहवालाच्या आधारावर जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एम. खान यांनी गुरुवारी (दि. २१) आरोपी यशवंत लिल्हारे याला आजन्म सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनात पैरवी कर्मचारी श्रीकांत मेश्राम यांनी काम पाहिले.
अशी सुनावली आहे शिक्षा...
न्यायाधीश खान यांनी आरोपीला भादंवि कलम ३०२ अंतर्गत सश्रम आजन्म कारावास व १० हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास ६ महिन्यांच्या अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठोठावली. तसेच कलम ३९७ अंतर्गत १० वर्षांचा सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास ६ महिन्यांच्या अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठोठावली. याशिवाय जिल्हा विधी सेवा प्राधिकरणने कलम ३५७ (अ) (२) फौ. प्र. सं.प्रमाणे फिर्यादीला सानुग्रह नुकसानभरपाई देण्यासाठी आदेशित केले आहे.