हत्येच्या प्रकरणातील आरोपीस जन्मठेप लोकमत न्यूज नेटवर्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 09:02 PM2017-09-07T21:02:26+5:302017-09-07T21:02:45+5:30
दोन वर्षांपूर्वीच्या हत्त्येच्या प्रकरणातील आरोपीस जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी गुरूवारी (दि.७) रोजी सुनावणी दरम्यान जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
गोंदिया : दोन वर्षांपूर्वीच्या हत्त्येच्या प्रकरणातील आरोपीस जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी गुरूवारी (दि.७) रोजी सुनावणी दरम्यान जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
देवा दुलीचंद बारेवार (२४) असे जन्मठेपेची शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश (प्रथम) कोठेवार यांनी या प्रकरणाची सुनावणी करताना देवा बारेवार याला जन्मठेपेची शिक्षा व एक हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंडाची रक्कम न भरल्यास पुन्हा सहा महिन्यांच्या अतिरिक्त शिक्षेची तरतूद केली आहे. तसेच कलम १३५ अन्वये सहा महिन्यांची शिक्षा व ५०० रूपयांचा दंड, दंडाची रक्कम न भरल्यास दोन महिन्यांची अतिरिक्त शिक्षा भोगावी लागेल. गोरेगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाºया गहेलाटोला येथे २४ आॅक्टोबर २०१५ रोजी ही हत्त्येची घटना घडली होती. एका सार्वजनिक कार्यक्रमात भोजन वाढण्याच्या बाबीवरून राजेश बेनीराम बोपचे व देवा दुलीचंद बारेवार (२४) यांच्यामध्ये वाद झाला. वाद सोडविण्याच्या उद्देशाने राजेशचा भाऊ दिनेश बेनीराम बोपचे (२१) देवा बारेवार याला थोड्या दूर अंतरावर नेले. दरम्यान देवा बारेवार याने धारदार शस्त्राने दिनेशवर वार केले यात दिनेशचा घटनास्थळीच मृत्यु झाला होता.
या प्रकरणाचा तपास एपीआय भरत कराडे यांच्या मार्गदर्शनात एएसआय कराडे यांनी केला. पुराव्यांच्या आधारावर न्यायाधीश कोठेवार यांनी देवा बारेवार याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात शासकीय वकील महेश चांदवानी यांनी सरकारच्या वतीने बाजू मांडली.