देवरीत विजेचा लपंडाव ; ऑनलाईन कामांचा खोळंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:29 AM2021-09-03T04:29:19+5:302021-09-03T04:29:19+5:30
देवरी : शहारासह ग्रामीण भागातही विजेचा लपंडाव सुरु असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. विद्यार्थ्यांचे ऑनलाईन क्लास सुरु असून विविध ...
देवरी : शहारासह ग्रामीण भागातही विजेचा लपंडाव सुरु असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. विद्यार्थ्यांचे ऑनलाईन क्लास सुरु असून विविध कंपन्यांतील कर्मचाऱ्यांचे वर्क फ्रॉम होम देखील सुरु आहे. दिवसांतून चार पाच वेळा वीजपुरवठा ठप्प होता. त्याचा फटका व्यावसायिकांना ही बसत आहे. विद्युत विभागाच्या गलथान कारभाराचा फटका सर्वात जास्त ग्रामीण जनतेला बसत आहे.
देवरी येथील विद्युत उपकेंद्र अगोदर ६६ केव्हीचे होते. परंतु मागील ८ वर्षांपासून ते ३३ केव्ही करण्यात आले आहे. वाढती लोकसंख्या, औद्योगिकरणाच्या दृष्टीने जास्त विजेची मागणी होत आहे. परंतु ३३ केव्ही उपकेंद्र असल्याने व एमआयडीसी क्षेत्रातील कंपन्यांना जास्तीची वीज लागत असल्याने देवरी शहरातील लोकांना त्याचा फटका बसत आहे. रात्रीला विजेचा दाब कमी होत असल्याने विद्युत उपकरणे खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. कमी दाब व वारंवार वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढले असून त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. कोराेनामुळे शाळा, काॅलेज बंद असल्याने ऑनलाईन शिक्षण सुरु केले आहे. मात्र वीजपुरवठा खंडित झाला की यंत्रणा बंद पडते. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तरीही वीज बिल भरमसाठ येत आहे. वीजपुरवठा सुरळीत होत नसेल तर महावितरण कंपनीने वीज देयके सुद्धा नागरिकांना वाटू नये,असा संताप नागिरकांनी व्यक्त केला आहे. विजेच्या अनेक समस्या असताना वीजबिले मात्र अव्वाच्या सव्वा पाठविली जातात. वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी परिसरातील नागिरकांनी केली आहे. ही समस्या सोडविण्यासाठी राजकीय मंडळींनी प्रयत्न करावे, अशी मागणी देवरीवासीयांनी केली आहे.