एकाच गटसचिवाने लावला सात संस्थांना चुना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:42 AM2021-02-26T04:42:30+5:302021-02-26T04:42:30+5:30
गोंदिया : विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या एकाच गटसचिवांने वेगवेगळा सात संस्थांमध्ये कार्यरत असताना ४२ लाख रुपयांचा अपहार केल्याची ...
गोंदिया : विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या एकाच गटसचिवांने वेगवेगळा सात संस्थांमध्ये कार्यरत असताना ४२ लाख रुपयांचा अपहार केल्याची बाब उघडकीस आली आहे. ही बाब ऑडिटमध्ये उघडकीस आल्यानंतर त्या गटसचिवावर तिरोडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला आहे.
सध्या जिल्ह्यात मुंडीकोटा येथील जागृती पतसंस्थेचा कोट्यवधी रुपयांचा घोटाळा गाजत आहे. याचदरम्यान गोंदिया येथील दोन पतसंस्थांचा घोटाळा पुढे आला होता. त्यामुळे पतसंस्थेच्या खातेदारांमध्ये खळबळ उडाली होती. अनेकांनी काबाळ कष्ट करून भविष्याची तरतूद म्हणून या संस्थांमध्ये पैसे जमा करून ठेवले होते. त्यावर सुद्धा संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांनी डल्ला मारला. ही घटना ताजी असताना आता गावपातळीवर शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करणाऱ्या विविध कार्यकारी सेवा संस्थेमधील घोळ पुढे आला आहे. तिरोडा तालुक्यातील सात विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थामध्ये कार्यरत असलेल्या एकाच गटसचिवाने त्याच्या कार्यकाळात ४२ लाख रुपयांचा अपहार केला. यासाठी शेतकऱ्यांच्या नावे कर्जाची उचल केली, तर रेकार्डमध्ये खोडतोड करून सुद्धा लाखो रुपयांचा अपहार केला. ही बाब उघडकीस आल्यानंतर या सचिवाने काही रक्कम भरून सुध्दा दिली. पण या सात विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या ऑडिटमध्ये गटसचिवानी तब्बल ४२ लाख रुपयांचा घोळ केला असल्याची बाब पुढे आली. यावरूनच त्याच्यावर तिरोडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा सुद्धा दाखल केला आहे. तब्बल सात संस्थांमध्ये घोळ करणाऱ्या या गटसचिवाची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे, तर अजून काही विविध सेवा सहकारी संस्थाचे ऑडिट सुरू असून, त्यात पुन्हा काय घबाड बाहेर येते याकडे लक्ष लागले आहे.
......