बँकेतून पैसे काढण्यावर मर्यादा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 10:08 PM2018-05-16T22:08:06+5:302018-05-16T22:08:06+5:30
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जीडीसीसी बँक व इतर बँकामध्ये नोटाबंदीनंतर निर्माण झालेला कॅशचा तुटवडा अद्याप कायम आहे. सध्या बँकेत केवळ मोजकीच रोकड असून त्यात संपूर्ण आठवडा भागवायचा आहे. परिणामी बँकेने खातेदारांच्या विड्रालवर बंधने घालत कमी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जीडीसीसी बँक व इतर बँकामध्ये नोटाबंदीनंतर निर्माण झालेला कॅशचा तुटवडा अद्याप कायम आहे. सध्या बँकेत केवळ मोजकीच रोकड असून त्यात संपूर्ण आठवडा भागवायचा आहे. परिणामी बँकेने खातेदारांच्या विड्रालवर बंधने घालत कमी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. असे असले तरी महिनाभरात खरीप हंगामाची लगबग सुरु होईल. त्यासाठी तालुक्यातील शेतकरी वर्गास खरीपासाठी तब्बल शंभर कोटीहून अधिक रक्कम लागेल. वेळीच रोकड उपलब्ध न झाल्यास व्यवहार ठप्प होण्याची भीती आहे.
८ नोव्हेंबर २०१६ रोजी एक हजार व ५०० रुपये मुल्याच्या नोटा चलनातून रद्द झाल्या. या नोटा बँकेत जमा करुन नवीन नोटा घेण्यासाठी बँकामध्ये गर्दी उसळली होती. दरम्यान, नोटबंदीच्या काळात देखील जिल्ह्यातील बँकामध्ये पुरेशी रोकड उपलब्ध होती. त्यानंतर वेळोवेळी बँकेत नवीन दोन हजार व ५०० रुपये मुल्याच्या नोटांची उपलब्धता झाली होती. मात्र, त्यानंतर सतत पैसे काढणाºयांची गर्दी वाढली असल्याने रोकड येणे कमी झाले.
एकंदरीत भरणा करणाऱ्यांपेक्षा पैसे काढणाऱ्यांची गर्दी राहिल्याने बँकेत आता रोख रकमेचा तुटवडा निर्माण झाला आहे. यापूर्वी देखील मार्च २०१७ मध्ये रोकड काढण्यावर बंधने लादण्यात आली होती.
आता देखील अत्यल्प कॅश असल्याने प्रत्येकी ग्राहक मोजकीच रक्कम खात्यातून काढू शकतो. या बंधनामुळे खातेदार व बँक कर्मचाºयांमध्ये दररोज खटके उडतात. अशीच परिस्थिती राहिली तर येणाºया खरीप हंगामासाठी शेतकरी वर्गाला लावणारा पैसा बँकेतून वेळेवर उपलब्ध होणे अडचणीचे होईल.
कॅशलेस एटीएम
बँकामध्ये कॅशचा तुटवडा निर्माण झाल्याने जिल्ह्यातील सर्व एटीएम कॅशलेस झालेल्या स्थितीत आहेत. त्यामुळे बँकेत पैशासाठी गर्दी वाढली. अशावेळी कॅश उपलब्ध न झाल्यास वादविवादाचे प्रसंग वाढू शकतात. याची दखल घेत बँकेच्या वरिष्ठ अधिकाºयांनी खातेदारांची गैरसोय होणार नाही. याची तसदी घेणे अपेक्षीत आहे. विशेषत: खरीप हंगामापूर्वी हा तिढा सुटणे अपेक्षित आहे.