लिंक फेलचा ग्राहकांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:30 AM2021-05-08T04:30:02+5:302021-05-08T04:30:02+5:30
नवेगावबांध : मागील पाच दिवसांपासून लिंक फेल असल्यामुळे येथील गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत व्यवहार ठप्प झाले आहे. ...
नवेगावबांध : मागील पाच दिवसांपासून लिंक फेल असल्यामुळे येथील गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत व्यवहार ठप्प झाले आहे. त्यामुळे ग्राहकांना याचा फटका बसत असून अनेकांची महत्त्वपूर्ण कामे रखडली आहेत.
सोमवारपासूृन (दि. ३) येथील जीडीसीसी बँक शाखेत तांत्रिक बिघाडामुळे लिंक नाही. परिणामी पाच दिवसांपासून बँकेचा व्यवहार ठप्प झालेला आहे. दररोज वाट पाहून ग्राहक कमालीचे संतप्त व त्रस्त झाले आहेत.
थोड्या वेळाने लिंक सुरळीत होईल ही आशा बाळगून ग्राहक बँकेमध्ये रोज हेलपाटे मारत आहेत. सकाळी साडेनऊ वाजता पासून ग्राहक शाखेत येऊन रांगा लावतात. दुपारी दोन वाजता पर्यंत वाट पाहतात मात्र त्यांना आल्या पावलीच परत जावे लागत आहे. असा प्रकार गेल्या पाच दिवसांपासून या बँक शाखेत घडत आहे. काय तांत्रिक बिघाड आहे, तो बँक प्रशासनाने त्वरित दूर करावा, अशी मागणी संतप्त ग्राहकांनी केली आहे. हा प्रकार मागील दोन महिन्यांपासून वांरवार सुरु आहे. ग्राहक केवायसीची प्रक्रिया मागील महिन्याभरापासून बंद असल्यामुळे अनेक ग्राहकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आता केवायसी करणे बंद आहे, असे उत्तर बँक कर्मचाऱ्यांकडून ग्राहकांना दिले जात आहे. केवायसी प्रक्रिया सुद्धा त्वरित सुरू करावी व आमचे बँक खाते अद्ययावत करावे अशी मागणी ग्राहकांनी केली आहे. परिसरातील खेड्यापाड्यातील लोकांना वाहतुकीची साधने उपलब्ध नसल्यामुळे, शारीरिक त्रासही सहन करावा लागतो आहे. उन्हातानात व पायी प्रवास करावा लागत असल्याने काही ग्राहकांची तब्येत बिघडल्याची माहिती आहे. त्यामुळे ग्राहकांची समस्या त्वरित मार्गी लावण्याची मागणी आहे.