गोंदिया-बल्लारशा रेल्वे गाडीतून दारूची तस्करी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 09:21 PM2018-11-18T21:21:21+5:302018-11-18T21:21:48+5:30
दारूबंदी असलेल्या चंद्रपूर येथे रेल्वे मार्गे जाणारी दारू रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी गोंडउमरी रेल्वे स्थानकावर पकडली. आरोपींजवळून १० पेट्या दारू जप्त केली. ही कारवाई १७ नोव्हेंबरला सायंकाळी ६.४० वाजता गोंदिया-बल्लारशा गाडी क्रमांक ५८८०४ मध्ये करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : दारूबंदी असलेल्या चंद्रपूर येथे रेल्वे मार्गे जाणारी दारू रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी गोंडउमरी रेल्वे स्थानकावर पकडली. आरोपींजवळून १० पेट्या दारू जप्त केली. ही कारवाई १७ नोव्हेंबरला सायंकाळी ६.४० वाजता गोंदिया-बल्लारशा गाडी क्रमांक ५८८०४ मध्ये करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये शामनगर बंगाली कॅम्प चंद्रपूर येथील विनोद राजेंद्र महतो (२५), मोहवाडा भद्रावती पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या चंद्रपूर येथील नित्यानंद हरेंद्रनाथ राजवंशी (३९) यांचा समावेश आहे.
ही कारवाई रेल्वे सुरक्षा बलाचे प्रभारी निरीक्षक एस. दत्ता, उपनिरीक्षक एस.एस.बघेल, मुख्य आरक्षक आर.सी. कटरे, एस.एस. बघेले, वी.एस. पटले यांनी केली. रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांना दोन व्यक्ती गोंडउमरी रेल्वे स्थानकावरुन दोन प्लास्टीक पोत्यांमध्ये जड वस्तू गाडीत चढवित असल्याचे आढळले.त्यांनी चौकशी केल्यावर दोन पोत्यांमध्ये दहा पेटी दारु जप्त करण्यात आल्या.
सदर दारुची किमत २६ हजार रुपये सांगितली जाते. सौंदड येथून दारु खरेदी करुन गोंडउमरी रेल्वे स्थानकावर ते पोहोचले.तिथून चंद्रपूरला जाण्यासाठी १७ नोव्हेंबरला ते बल्लारशाह-गोंदिया गाडीवर आले असताना रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी पकडले.
रेल्वे गाडीतून दारू तस्करीत वाढ
लगतच्या चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी असल्याने या जिल्ह्यात गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात दारुची तस्करी सुरु आहे. पोलिसांची नजर चुकविण्यासाठी दारु तस्कारांनी गोंदिया-बल्लारशा मार्गावर धावणाऱ्या रेल्वे गाड्यांचा आधार घेतला आहे. गेल्या महिनाभरात रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांनी रेल्वे गाड्यांमध्ये पाळत ठेवून आठ ते दहा दारु तस्करांना मुद्देमालासह अटक केली आहे.
नाकाबंदीवर प्रश्नचिन्ह
चंदपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी असल्याने या जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात वाहनांची तपासणी केली जाते. मात्र यानंतर सुध्दा ट्रक आणि इतर वाहनांतून सर्रासपणे दारुची वाहतूक सुरू असल्याचे चित्र आहे. गोंदिया जिल्ह्याला लागून असलेल्या काही गावातून या दोन्ही जिल्ह्यात दारुची तस्करी होत आहे. त्यामुळे पोलीस विभागाच्या नाकाबंदी आणि तपासणीवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
रेसुबने वाढविली गस्त
मागील काही दिवसांपासून गोंदिया-बल्लारशा रेल्वे गाड्यांमधून दारुची तस्करी केली जात असल्याचे प्रकार उघडकीस आल्यानंतर रेल्वे गाड्यांमध्ये रेल्वे सुरक्षा बलाने गस्त वाढविली आहे. तसेच संशयीत सामानाची कसून चौकशी केली जात असल्यानेच दारु तस्करांच्या मुसक्या आवळण्यास मदत होत आहे.