घरातच ‘भट्टी’ पेटवली, ३.७० लाखांची दारू जप्त; तीन जणांवर गुन्हे दाखल
By नरेश रहिले | Published: September 17, 2023 10:22 PM2023-09-17T22:22:25+5:302023-09-17T22:23:04+5:30
या घटनेसंदर्भात तिरोडा पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
गोंदिया : तिरोडा पोलिसांनी संत रविदास वाॅर्डात धाड घालून तीन लाख ६९ हजार ६५० रुपये किंमतीचे मोहफुल, हातभट्टीची दारू व इतर साहित्य जप्त केले. ही कारवाई रविवारी (दि.१७) पोलिस उपनिरीक्षक विजय पुंडे व त्यांच्या पथकाने केली आहे. या घटनेसंदर्भात तिरोडा पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
संत रविदास वॉर्डात पोलिस निरीक्षक देविदास कठाडे, पोलिस उपनिरीक्षक विजय पुंडे, पोलिस उपनिरीक्षक दलालवाड. परिविक्षाधीन पोलिस उपनिरीक्षक बरड, शिपाई दमाहे, शेंडे, माहुले, बोपचे हे पेट्रोलिंग करीत असताना त्यांना सुरज प्रकाश बरीयेकर (३५) आपल्या घरी अवैधरित्या मोहफुलाची भट्टी लावून दारू गाळत असल्याची माहिती मिळताच त्यांनी सुरज बरीयेकरच्या घरी धाड घातली. यात त्यांना घराच्या मागील खोलीत एका चुलीवर लोखंडी ड्रम मांडून मोहफुलांची दारू गाळताना माया प्रकाश बरीयेकर (६०) व प्रिया सुरज बरीयेकर (३३, तिन्ही रा. संत रविदास वाॅर्ड) तेथे मिळून आले.
पोलिसांना तेथे तीन लाख ६९ हजार ६५० रुपयांचा माल अवैधरित्या मिळून आला. यावर त्यांनी नगर परिषदेचे ट्रक्टर बोलावून मोहफुल, हातभट्टीची दारू, जळावू काड्या, लोखंडी ड्रम, नेवार पट्टी, प्लास्टिक पाईप आदी सर्व माल त्यामध्ये भरून काशिघाट नाल्यावर नेवून नष्ट केला. आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (ब, क, ड, ई, फ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मडामे, पोलिस निरीक्षक देविदास कठाडे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.