थकबाकीदारांची चौकात यादी लावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 11:41 PM2018-02-22T23:41:22+5:302018-02-22T23:42:22+5:30
नगर परिषदेच्या कर वसुलीचे काऊंट डाऊन सुरू झाले असून यंदा नगर परिषदेला मागील थकबाकी व मागणी असे एकूण नऊ कोटी २० लाख २६ हजार १२५ रूपयांचे टार्गेट आहे. हे टार्गेट सर करण्यासाठी नगर परिषदेने यंदा कठोर पाऊले उचलत कंबर कसली आहे.
ऑनलाईन लोकमत
गोंदिया : नगर परिषदेच्या कर वसुलीचे काऊंट डाऊन सुरू झाले असून यंदा नगर परिषदेला मागील थकबाकी व मागणी असे एकूण नऊ कोटी २० लाख २६ हजार १२५ रूपयांचे टार्गेट आहे. हे टार्गेट सर करण्यासाठी नगर परिषदेने यंदा कठोर पाऊले उचलत कंबर कसली आहे. यासाठी नगर परिषदेने थकबाकीदारांना कर भरा अन्यथा मालमत्ता जप्ती व थकबाकीदारांच्या नावांची यादी शहरातील चौकाचौकांत लावण्याचा इशाराच दिला आहे.
नगर परिषदेला सर्वात मोठी डोकेदुखीचे काम मालमत्ता कर वसुलीचे झाले आहे. शहरात अनेक श्रीमंताकडे मालमत्ता कराची मोठी रक्कम थकीत आहे. अशात यंदा नगर परिषदेला मागील थकबाकी व चालू मागणी असे एकूण ९.२० कोटी रूपये कर वसुलीचे टार्गेट आहे. त्यात मागील वर्षापासून राज्य शासनाकडून शंभर टक्के कर वसुलीचा फतवा काढल्याने नगर परिषदेची चांगलीच अडचण होत आहे. शंभर टक्के कर वसुली अशक्य असतानाही कर वसुली विभागाचे कर्मचारी मात्र थकबाकीदारांकडे जाऊन जास्तीत जास्त कर वसुली करीत आहेत. पण, कित्येक थकबाकीदार काहीना काही शक्कल लढवून कराचा भरणा टाळतात. हाच प्रकार मागील कित्येक वर्षांपासून सुरू असल्यामुळे नगर परिषदेची मागील थकबाकी चांगलीच वाढली आहे. या प्रकारावर आळा बसावा म्हणून तत्कालीन मुख्याधिकारी सुमंत मोरे यांनी मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यास सुरूवात केली होती. त्यानुसार मागील वर्षीही नगर परिषदेने थकबाकीदारांची मालमत्ता सील केल्याने चांगले परिणाम मिळाले. यंदा तर नगर परिषदेने थकबाकीदारांची गय करायची नाही असेच काही ठरविले आहे. नगर परिषदेने आतापासूनच थकबाकीदारांना त्यांच्याकडील मालमत्ता कराचा भराणा करा असे आवाहन केले. अन्यथा थकबाकीदारांची मालमत्ता जप्त करून त्यांच्या नावांची यादी शहरातील चौकाचौकांत लावण्याचा इशाराही दिला आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही नगर परिषदेने हाच प्रयोग अंमलात आणला होता. त्याचे चांगले परिणाम नगर परिषदेला बघावयास मिळाले होते. त्यामुळे यंदाही नगर परिषद तोच प्रयोग राबविणार आहे.
सुटीच्या दिवशीही कार्यालय सुरू
नगर परिषदेने थकबाकीदारांना २८ तारखेपर्यंत कराचा भरणा करण्याची वेळ दिली आहे. यासाठी सुटीच्या दिवशीही दुसºया व चौथ्या शनिवारीही मालमत्ता कर विभाग सुरू ठेवले जाणार आहे. शहरवासीयांना याबाबत माहिती व्हावी यासाठी मुनादीही केली जात आहे. मागील नगर परिषदेने ५२ टक्के कर वसुली केल्याची माहिती आहे. यंदा यात किती भर पडते हे येणाºया काळातच कळेल.